Tue, Sep 17, 2019 04:44होमपेज › Aurangabad › सुरळीत पाण्यासाठी पुन्हा तीन दिवस

सुरळीत पाण्यासाठी पुन्हा तीन दिवस

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील पाणीप्रश्‍नावर सोमवारी सर्वसाधारण सभेत तब्बल चार तास वादळी चर्चा झाली. प्रभारी मनपा आयुक्‍तांनी मागील आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकार्‍यांना तीन दिवसांची मुदत दिली होती, परंतु त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्याने सर्वच नगरसेवकांनी संताप व्यक्‍त केला. विशेषतः सिडको-हडकोतील नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील परिस्थिती मांडत प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी महापौरांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.

दोन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक असताना सिडको-हडको तसेच जुन्या शहरातील कित्येक वॉर्डात सहा-सहा दिवस पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. याच्या विरोधात आठवडाभरापूर्वीच सिडकोतील नगरसेवकांनी एन-5 च्या जलकुंभावर आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी मनपा आयुक्‍त नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तीन दिवसांत समान पाणी वाटप करण्याचे आदेश दिले. मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. मनपाच्या सोमवारच्या सभेत भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, भगवान घडामोडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, माधुरी अदवंत, राजू शिंदे, राज वानखेडे आदी नगरसेवकांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. सिडको एन-5 च्या जलकुंभात सध्या 30 एमएलडी ऐवजी केवळ चार ते पाचच एमएलडी पाणी मिळत आहे.

एक्स्प्रेस लाईनवर जागोजागी क्रॉस कनेक्शन घेऊन पाणी वळविण्यात आल्याने या जलकुंभात पाणी येत नाही, असा आरोप यावेळी या नगरसेवकांनी केला. सेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी एक्स्प्रेस लाईनवरून पुंडलिकनगर, शिवाजीनगर जलकुंभासाठी खूप आधीपासून क्रॉस घेण्यात आलेले आहेत, इतके दिवस अडचण आली नाही, असे सांगत आत्ताच ही परिस्थिती का उद्भवली याचा अधिकार्‍यांनी अभ्यास करावा, अशी सूचना केली. मनगटे यांनी पुंडलिकनगर जलकुंभावरून सिडको एन-3 ला पाणी देण्याचा प्रश्‍न उपस्थित केला. याच वेळी एमआयएमचे नगरसेवकही जुन्या शहरातील पाणीप्रश्‍न घेऊन बोलते झाले. त्यामुळे गोंधळ वाढल्याने दुपारी ही सभा तासाभरासाठी तहकूब करण्यात आली.

त्यानंतर पुन्हा सभा सुरू झाल्यावरही सिडको-हडकोसह शहरातील विविध भागांतील नगरसेवकांनी पाणीप्रश्‍नावरील भावना मांडल्या. प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नसल्यानेच पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक राजू शिंदे यांनी केला. नगरसेवक राजू वैद्य आणि माजी महापौर भगवान घडामोडे यांनी उलट्या क्रमाने म्हणजे शेवटाकडून अलीकडे जलकुंभ भरत गेल्यास निम्मा पाणीप्रश्‍न सुटेल अशी सूचना मांडली. चर्चेदरम्यान वेळोवेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता इलियाज ख्वाजा, फालक यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने सभागृहाचे समाधान झाले नाही. शेवटी महापौरांनी तीन दिवसांत योग्य नियोजन करून पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे आदेश दिले. 

Tags : Aurangabad, Three, days, regular, water, supply


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex