होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ

मराठवाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 12:44AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मानवत (जि. परभणी) येथे 9 दुकानांचे शटर वाकवून गल्ल्यातील रोख रक्‍कम लंपास करण्यात आली. जालना, उदगीरमध्येही धाडसी चोर्‍या झाल्या.  

मानवतला मोंढा परिसरातील 7 तर बसस्थानकाजवळील 2 अशी एकूण 9 दुकाने  मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मोंढा परिसरातील कैलास गोलाईत यांच्या कैलास बारचे शटर वाकवून गल्ला फोडून 2 हजार चिल्लर व 10 हजार रुपयांच्या दारू बाटल्या पळविल्या. यानंतर चोरट्यांनी बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समधील शंकर तरटे यांचे नर्मदा ट्रेडिंग, राजाभाऊ शिंदे यांचे मिलन ट्रेडिंग, प्रताप देशमुख यांचे विठ्ठल ट्रेडिंग, बाळासाहेब पवार यांचे पवार ट्रेडिंग ह्या भुसार मालाच्या दुकानांसह माणिक जाधव यांचे पांडुरंग कृषी केंद्र, सुरेश सोरेकर यांचे गणेश किराणा यांच्या दुकानांचे शटर वाकवून दुकानात प्रवेश करीत गल्ला फोडला. गल्ल्यातील प्रत्येकी 1 हजार ते 2 हजारांची चिल्लर रक्कम लंपास केली. यानंतर चोरट्यांनी महाराणा प्रताप चौकाकडे आपला मोर्चा वळवला. तेथील रिद्धी-सिद्धी कॉम्प्लेक्समधील कपिल खके यांच्या महेश किराणा दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यातील 20 हजार रुपये पळवून नेले. याच कॉम्प्लेक्समधील लक्ष्मीनारायण सोमाणी यांचे सोमाणी ट्रेडिंग या भुसार मालाच्या दुकानाचे शटर वाकविण्याचा प्रयत्न करीत असताना वॉचमन जागा झाल्याने तेथून पळ काढला. 

उदगीरात डॉक्टरकडे चोरी

उदगीर (जि. लातूर) येथे डॉ. प्रदीप जठाळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा तब्बल 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील शाहू कॉलनीत डॉ. जटाळे यांचे घर आहे. ते सोमवारी पत्नी व मुलांना भेटण्यासाठी लातूरला गेले होते. हे हेरून चोरट्यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 2 लाख 96 हजार रुपयांचे 14 तोळे 8  ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 तोळे चांदीचे दागिने किंमत 10,500 तसेच 1 लाख रुपयांचा मोत्याचा नेकलेस सेट व रोख 20 हजार रुपये असा तब्बल 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. 

८ लाखांचा ऐवज लंपास

जालन्यात करवानगरातील  किशन शहा या व्यापार्‍याचे घर मंगळवारी रात्री फोडून चोरट्यांनी 7 लाख 95 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात तीन लाख 40 हजार रोख रक्‍कम, सोन्याचे दागिने, चांदीचे एक किलोचे ताट,  चांदीचे शिक्के असा ऐवज चोरून नेला. सदरबाजार ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला.