होमपेज › Aurangabad › सेवानिवृत्तीच्या तोंडावर 32 कोटींच्या बिलांचे वाटप

सेवानिवृत्तीच्या तोंडावर 32 कोटींच्या बिलांचे वाटप

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 04 2018 12:40AM

बुकमार्क करा
औरंंगाबाद ः प्रतिनिधी

महानगरपालिकेला मागील काही महिन्यांपासून दैनंदिन आणि बांधील खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी आहे. त्यातच आता लेखा विभागातील एका अधिकार्‍याने सेवानिवृत्तीच्या तोंडावर ठेकेदारांची तब्बल 32 कोटी रुपयांची बिले वाटली आहेत. त्यामुळे पालिकेला आता चालू महिन्यात कर्मचार्‍यांचे पगार आणि वीज बिलाची रक्‍कम भरणेही अवघड होऊन बसले आहे. 

मनपाच्या लेखा विभागातील लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी हे 30 डिसेंबर 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याआधी 1 नोव्हेंबरपासून मुख्य लेखाधिकारी राम साळुंके हे रजेवर गेल्याने दुर्राणी यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी पदाचा अतिरिक्‍त पदभार सोपविण्यात आला होता. हा पदभार येताच दुर्राणी यांनी ठेकेदारांची थकीत बिले तातडीने अदा करण्याचा धडाका लावला. विशेष म्हणजे सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. कसेबसे जीएसटीच्या अनुदानातून कर्मचार्‍यांचे पगार आणि पाणीपुरवठा योजनेचे दरमहाचे तीन कोटी रुपयांचे वीज बिल अदा करण्यात येत आहे. तर अत्यल्प प्रमाणात होत असलेल्या कर वसुलीतून इतर दैनंदिन खर्च भागविण्यात येत आहेत. त्यामुळे लेखा विभागाकडून सर्व दैनंदिन आणि बांधील खर्चाचे नियोजन करून काही रक्‍कम उरली तरच त्यातून ठेकेदारांची बिले काढली जातात. मात्र दुर्राणी यांनी कोणताही विचार न करता 1 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या दीड महिन्याच्या काळात तब्बल 277 ठेकेदारांचे 32 कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे. त्यामुळे सध्या पालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे.

मुख्य लेखाधिकारी राम साळुंके हे दुर्राणी सेवानिवृत्त होण्याच्या आठवडाभर आधीच रजेवरून परतले. त्यानंतर त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने कागदपत्रांसह ही बाब 29 डिसेंबर रोजीच मनपा आयुक्‍तांच्या कानावर घातली. मनपा आयुक्‍तांनीही तातडीने या प्रकरणाची दखल घेत दुर्राणी यांना सेवानिवृत्तीच्याच दिवशी बोलावून याविषयी नोटीस बजावली. तसेच त्यांच्या पेन्शन बाबतही सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मनपाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. बांधील आणि दैनंदिन खर्चाचा विचार न करता ठेकेदारांची एवढ्या प्रमाणावर बिले अदा केल्याने नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे मनपा आयुक्‍तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी.
- नंदकुमार घोडेले, महापौर