Fri, Sep 20, 2019 22:26होमपेज › Aurangabad › ‘पुरातत्त्व’ची उदासीनता; थत्ते हौद कोरडा

‘पुरातत्त्व’ची उदासीनता; थत्ते हौद कोरडा

Published On: Nov 26 2018 1:34AM | Last Updated: Nov 26 2018 1:34AMऔरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

अख्ख्या बेगमपुरा परिसरातील रहिवाशांची एकेकाळी तहान भागविणारा ऐतिहासिक थत्ते हौद हा पाच वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पूर्वीसारखे पाणी मिळत नसल्याने नाराजी दिसून येत आहे.

बेगमपुरा परिसरात भगवंत नाईक यांनी अडीचशे वषार्र्ंपूर्वी स्वतःच्या जिद्दीवर त्यांच्या वाड्यासमोर सुंदर व आकर्षक मोठा हौद बांधला आहे. थत्ते कुटुंब हे मूळचे कोकणातले आहे. त्यांचे पूर्वज प्रथम पुण्यात कालांतराने अठराव्या शतकात औरंगाबादला येऊन सावकारी करत होते. सध्या थत्ते कुटुंबाची आठवी पिढी बेगमपुर्‍यातील वाड्यात राहत आहे. भगवंत नाईक हे सावकार असल्याने सधन कुटुंब होते. त्यांचे बेगमपुरा भागात अनेक वाडे व बागा होत्या. त्याला पाण्याची गरज भासू लागली होती. त्यामुळे भगवान नाईक यांनी हर्सूल परिसरात असलेल्या तलावाचे पाणी नहरीच्या माध्यमातून स्वतःच्या वाड्यासमोर बांधलेल्या मोठ्या हौदात आणले. या हौदाचे शिल्प घोटीव व नमुनेदार आहे. त्याची लांबी व रुंदी बेचाळीस फूट आहे. तर खोली दहा फूट आहे.

हौदाच्या चारही भिंतीच्या कडांना टिकाऊ स्वरूपाचा गिलावा असल्याने इतक्या वर्षानंतर देखील वाड्यात थोडाही ओलावा नाही. हौदाच्या मध्यभागी आकर्षक असा कारंजा आहे. उजव्या बाजूला पंधरा फूट उंच भिंत असून तिच्या पोकळीत जमिनीखालून मातीच्या नळावाटे पाणी येते. डाव्या बाजूला चौकोनी मोरी असून तिच्या टाक्यातील गाळ काढण्यासाठी उपयोग होतो. बेगमपुर्‍यात गवळी समाजाच्या लोकांची वस्ती मोठी आहे. त्यांच्या दुभत्या जनावरांना थत्ते हौदाचा मोठा आधार आहे.

1972 पासून पुरातत्त्व विभागाकडे 

बेगमपुर्‍यातील थत्ते हौद हा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याची 1972 पासून देखरेखीची जबाबदारी सरकारने पुरातत्त्व विभागाकडे सोपविली. तेव्हापासून दुरुस्ती, साफसफाई व रंगरंगोटीचे ते दरवर्षी काम करत आले आहेत, मात्र पाच वषार्र्ंपासून त्यांनी निधी नसल्याच्या नावाखाली देखरेख बंद केली. तेव्हापासून हौदात पाणी येणे कमी झाले आहे. आता तर हा हौद कोरडा ठाक पडला आहे. विशेष म्हणजे नहरीचे पाणी मकबर्‍यापर्यंत येत आहे. त्यापुढेच अडचण निर्माण झाली. याबाबत पुरातत्त्व विभागास थत्ते कुटुंबाने सांगितल्यास ते निधी नसल्याचे सांगत असल्याचे अनंत विनायक थत्ते यांनी सांगितले.

दुष्काळात जीवदान : थत्ते हौदाचे पाणी पूर्वी कित्येक घरांतून खेळविले होते. तसेच सन 1972 मध्ये दुष्काळ असताना हौदाने त्याच्याशी शर्थीची झुंज दिली. शेकडो कुटुंबाना जीवदान दिले. पूर्वी सर्कस सोबत येणारे हत्ती व इतर जनावरांनी येथेच आपली तहान भागविली आहे. हौदाकडे दुर्लक्ष होण्यापूर्वीपयर्र्ंत शेकडो लोक विनामूल्य या पाण्याचा वापर करत आले आहेत.