Mon, Jul 06, 2020 04:34होमपेज › Aurangabad › स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल

Published On: Aug 05 2018 1:39AM | Last Updated: Aug 05 2018 1:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील वाहतूक नियमन आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रकल्पातून तब्बल 118 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांच्या निविदा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीने प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरात जागोजागी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कमांड सेंटर उभारणे, डिजिटल डिसप्ले लावणे, इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी शहर वायफाय करणे, स्मार्ट बस थांबे उभारणे अशा कामांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वीच औरंगाबाद शहराची निवड झाली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद शहराला आतापर्यंत 283 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात शंभर सिटी बस खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर आता शहर सुरक्षा, वाहतूक नियमन आणि कम्युनिकेशन नेटवर्कमधील सुधारणांसाठी 118 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सिटी कम्युनिकेशन नेटवर्क उभारणे, पोलिसांसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम उभारणे, मनपासाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम उभारणे, सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि स्मार्ट बस स्टॉप उभारणे, शहर वायफाय करणे, डिजिटल डिसप्ले लावणे, घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्यांना जीपीएस बसविणे, औरंगाबाद सिटीजन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि पोर्टल तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठीच्या निविदा 6 सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ही सर्व कामे सात महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहे.

जागोजागी सीसीटीव्ही

स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालयात असेल. त्याच पद्धतीने एक नियंत्रण कक्ष मनपातही असणार आहे. तेथून शहरात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे शक्य होईल. 

स्मार्ट बस स्टॉप

सिटी बसचे शहरातील सर्व बस थांबे स्मार्ट बनविले जातील. या थांब्यांमध्ये नागरिकांना बसचे मार्ग, बसच्या वेळा याची माहिती देणारे डिजिटल बोर्ड असतील. इमर्जन्सी कॉल सेंटरही असतील. या बस थांब्यांवर सोलार पॅनल असतील. 

वाय फायचे सातशे स्पॉट

शहरवासीयांना मोफत इंटरनेट सुविधा देण्यासाठी वाय फाय स्पॉट बनविले जाणार आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये एकूण सातशे वाय फाय स्पॉट असतील. 

सिटिजन्स अ‍ॅप

शहरवासीयांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सिटिजन्स अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. याशिवाय एक वेब पोर्टलही सुरू केले जाईल. हे पोर्टल आणि अ‍ॅप सिटी ओपीएस सेंटरला कनेक्ट असेल.