होमपेज › Aurangabad › महसुली कामकाजाची घडी विस्कटली

महसुली कामकाजाची घडी विस्कटली

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 03 2018 12:05AM-रवी माताडे
 

शासनाचा चेहरा म्हणजे महसूल विभाग. दरवर्षी मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात महसूल विभागात बदल्यांचा सीझन असतो. अधिकारी-कर्मचार्‍यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. इच्छितस्थळी नियुक्‍ती मिळवण्यासाठी मार्गांचा शोध घेणे, संबंधितांपर्यंत पोहोचणे, पत्र-फोनाफोनी करून वरिष्ठ अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचे प्रकारही या काळात वाढतात. या सर्व उचापतींमुळे महसूल विभागातील मूळ कामाकडे अधिकारी-कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होते. परिणामी, सर्वसामान्यांची कामे खोळंबतात. नवनियुक्‍त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील लिपिक, अव्वल कारकून, मंडळ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले, तर उपविभागीय अधिकार्‍यांनी तलाठ्यांचे बस्तान हलवले. या सर्व धामधुमीत महसूलमधील कामकाजाची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. 

बदल्यांच्या वार्‍यात अधिकार्‍यांनी यंदा विनंती अर्जांचा विचार न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे बदलीनंतर मिळालेल्या नियुक्‍तीवर अनेकांनी नाराजीचा राग आळवला आहे. त्यामुळे ही बदली रद्द करून, दुसर्‍या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे आवडीचा टेबल न मिळाल्याने असलेल्या नाराजीचा परिणाम कामावर होणार आहे. हे मला माहितीच नाही, मी नवीन आहे, असा मंत्र जपत जाणून-बुजून काम रेंगाळत ठेवण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, बदल्यांच्या या खेळात पुन्हा एकदा सर्वसामान्य जनता भरडली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. टेबलवर नवीन असला तरी नोकरीत काही नवीन नाही, कामाचे स्वरूप फार काही बदललेले नाही, त्यामुळे कारणे देऊन काम टाळणार्‍या अशा अधिकारी-कर्मचार्‍यांकडून काम करून घेण्याची धमक वरिष्ठ अधिकार्‍यांना निर्माण करावी लागणार आहे. 

तसेच बदल्यांचे आदेश काढल्यानंतर इच्छित टेबल, जागा मिळवण्यासाठी राजकीय दबावतंत्र वापरण्याचे फंडे जिल्ह्यात अनेकांना चांगलेच जमतात. त्यामुळे बदल्यांनंतर वरवर बसलेली ही घडी व्यवस्थित बसलेली दिसत असली तरी आणखी आठवडाभर यात फेरबदल होत राहतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

दुसरीकडे शासनानेही जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या पाच महिन्यांपासून रिक्‍त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी आणि सिल्लोड उपविभागीय अधिकारी पदावर नवीन अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारीपदी संजीव जाधवर यांची वर्णी लागली आहे. जाधवर यांनी यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम केलेले आहे.

तर विभागीय आयुक्‍तालयातील नगरपालिका प्रशासन उपसंचालक रिता मैत्रेवार यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग सोपवण्यात आला आहे. हे आदेशही शुक्रवारी रात्री जारी झाले. सोमवारपर्यंत नवीन अधिकारी या पदांची सूत्रे स्वीकारतील. वरिष्ठ अधिकार्‍यांची रिक्‍त असलेली पदे भरल्याने अतिरिक्‍त कारभार पाहणारे अधिकारी आता मोकळे झाले आहेत. तर जाधवर आणि मैत्रेवार या दोन्ही अधिकार्‍यांनी जिल्ह्यात काम केलेले असल्याने तसेच अधिकार्‍यांची स्टे्ंरथ वाढल्याने, जिल्हा प्रशासनाच्या कामाचाही वेग वाढेल अशी अपेक्षा आहे.