होमपेज › Aurangabad › मुलांना तरी आरक्षण द्या...चिठ्ठी लिहून कामगाराची औरंगाबादेत आत्महत्या

मुलांना तरी आरक्षण द्या...चिठ्ठी लिहून कामगाराची औरंगाबादेत आत्महत्या

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाचा असल्याने मला सरकारचे कोणतेही फायदे मिळाले नाहीत, आता मी आत्महत्या केल्याने माझ्या मुलांना आरक्षण देण्यात यावे, अशी सुसाईड नोट लिहून एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास विजयनगर येथे उघडकीस आली. कारभारी दादाराव शेळके (43, रा. प्लॉट नंबर 7, विजयनगर, गारखेडा) असे आत्महत्या करणार्‍या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारभारी शेळके हे वाळूज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कामाला होते. मात्र, त्यांना मिळत असलेला पगार कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे त्यांनी श्रीराम फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज ते वेळेत फेडू न शकल्याने कंपनीने त्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावला होता. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. त्यातूनच त्यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री त्यांनी खोलीतील छताच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार पहाटे अडीच वाजता घरातील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देऊन बेशुद्धावस्थेत शेळके यांना घाटीत आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दहा लाखांची मदत

कारभारी शेळके यांनी आत्महत्या केल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासनाने त्यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच कारभारी कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत व एका व्यक्‍तीस नोकरीचे पत्र त्यांनी दिले.