Sat, Aug 24, 2019 09:47होमपेज › Aurangabad › ‘पार्सल’ची माहिती घ्यायला पोलिस पथक भिवंडीला

‘पार्सल’ची माहिती घ्यायला पोलिस पथक भिवंडीला

Published On: Jun 01 2018 1:56AM | Last Updated: Jun 01 2018 12:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ऑनलाइन शॉपिग आणि पार्सलसंबंधी जी माहिती येथेच मिळाली असती ती माहिती घेण्यासाठी गुन्हे शाखेची दोन पथके थेट भिवंडीला गेली. तेथे इन्स्टाकार्ट कुरियरच्या मुख्य गोदामाला भेट देऊन माहिती घेतली; परंतु काहीही हाती न लागल्याने पथक रिकाम्या हाती परतले.

‘फ्लिपकार्ट’वरून ऑनलाइन शस्त्र खरेदी करणार्‍यांचा औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश केला. इन्स्टाकार्ट कुरियरच्या नागेश्‍वरवाडी आणि जयभवानीनगर येथील कार्यालयात छापा मारून पोलिसांनी जवळपास 38 शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी क्रांती चौक आणि मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. दुसर्‍या दिवशी पुन्हा एका खरेदीदाराला बेड्या ठोकल्या. या आठपैकी चौघे पोलिस कोठडीत आहेत. तर, चौघांना मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, गुन्हे शाखेची दोन पथके अधिक तपासासाठी म्हणून भिवंडी येथे पाठविण्यात आली होती.

कसा चालतो व्यवहार ः फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर कोणत्याही वस्तूची ऑर्डर दिली की त्यांच्या मुख्यालयात बंगळुरू (कर्नाटक) येथे त्याची नोंद होते. तेथून ग्राहकाचा पत्ता, मोबाइल क्रमांक आणि इतर डिटेल्स संबंधित विभागाला जातात. ते वस्तू पॅकिंग करून लगेचच पत्त्यावर पाठवून देतात. त्यासाठी कुरियर सेवेचा लाभ घेतला जातो. या कुरियर सेवा आपल्या मुख्यालयातून या वस्तू मुदतीत पोहोच करण्याचे काम करतात. ही माहिती भिवंडीला गेलेल्या पथकाला मिळाली आहे.