Thu, May 23, 2019 23:11होमपेज › Aurangabad › भय्यू महाराजांचे औरंगाबादशी जुने ऋणानुबंध

भय्यू महाराजांचे औरंगाबादशी जुने ऋणानुबंध

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 12:49AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे औरंगाबाद शहराशी जुने ऋणानुबंध राहिलेले आहेत. त्यांच्या सासुरवाडीतील व्यक्‍ती समर्थनगरात वास्तव्यास होत्या. तसेच त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार शहरात होता. त्यामुळे ते नेहमीच शहरात येत असत. त्यांच्या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यात खूप मोठे सामाजिक कार्यही उभे राहिले.

भय्यू महाराज यांच्या निधनाची बातमी दुपारीच शहरात धडकली. भय्यू महाराज हे इंदूर येथील असले तरी त्यांचे औरंगाबाद शहराशी जुने नाते होते. त्यांच्या पहिल्या पत्नी माधवी निंबाळकर औरंगाबादेतील समर्थनगरातील रहिवासी होत्या. सासुरवाडीच्या निमित्ताने ते शहरात येत असत. यासोबतच मागील वीस वर्षांपासून त्यांचा खूप मोठा शिष्यवर्ग औरंगाबादेत आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे तसेच अकिल अब्बास यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. भय्यू महाराज यांच्या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यात नेहमीच सामाजिक कार्य सुरू राहिले. यामध्ये प्रामुख्याने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रुग्णवाहिका तसेच जिल्ह्यातील काही भागात जलसंधारणाची कामे करण्यात आली.

प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले की, मी पंधरा वर्षांपासून भय्यू महाराजांशी जोडले गेलेलो होतो.  त्यांचे आणि माझे गुरू-शिष्याचे नाते होते. त्यांच्या आशीर्वादाने मी शहरात बरीच वर्षे मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबविला. अपवाद वगळता या उपक्रमात मी नेहमीच सहभागी होतो. अंबादास दानवे म्हणाले की, माझा वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा भय्यू महाराजांशी संबंध आला. ते माझे गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारा हजार विद्यार्थ्यांना सूर्यादय शिष्यवृत्ती दिली. शहरात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांचे या शहरात विशेष प्रेम होते. भय्यू महाराजांच्या माध्यमातून मराठवाड्यातही जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले.