Fri, Jun 05, 2020 21:42होमपेज › Aurangabad › सुप्रिया सुळेंकडून पुणेरी समाचार; म्हणाल्या, भांडण दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिले!

सुप्रिया सुळेंकडून पुणेरी समाचार; म्हणाल्या, भांडण दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिले!

Published On: Sep 11 2019 5:47PM | Last Updated: Sep 11 2019 5:49PM

खासदार सुप्रिया सुळेऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नाही. हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर यथेच्छ टीकास्त्र सोडले.  

हर्षवर्धन पाटील यांचा टीकेचा वाग्बाण संपूर्णत: पवार कुटुंबीयांवर राहिला. आज मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पाटील यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादीमुळे भाजप प्रवेश केला असे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान म्हणजे भांडण दीरासोबत आणि नवर्‍याला सोडून चालले असे आहे. असा टोलाच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी औरंगाबादेत लगावला.

त्यांच्या मुलीच्या जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीने फार मदत केली. इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादीने आपला विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केला. खरं तर काँग्रेसचे नेते राहूल गांधी, सोनिया गांधी आणि आपली कधीही इंदापूरच्या जागेबाबत बैठक झाली नव्हती. परंतु, त्यांनी तसेच आरोप करीत भाजप प्रवेश केला.

दुसरीकडे अजित पवार यांनीही हल्ला चढवला. ते म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर सुरु होती. इंदापूरला सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या जागेसंबंधी आम्ही हर्षवर्धन पाटील यांना कोणताही शब्द दिला नव्हता. हर्षवर्धन पाटील व माझा राजकीय वाद आहे, परंतु आम्ही शब्द पाळला नाही, हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम कोणी करू नये, ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. 

मी स्पष्टपणे विधानसभेच्या जागेचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे घेतील, तो जे निर्णय घेतील तो मी शिरसांवद्य मानेल, असे सांगितले होते. पाटील यांनी मेळावा घेतल्यानंतर मी त्यांना ५० ते ५५ फोन केले. पुण्यातील त्यांच्या घरी गेलो, परंतु ते तेथे भेटले नाहीत. त्यांनी आधीच त्यांचा निर्णय घेतला होता आणि आता आमच्या नावाने पावती फाडत आहेत, असे पवार म्हणाले.