Wed, Jun 03, 2020 18:15होमपेज › Aurangabad › भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत

भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 12:52AMऔरंगाबाद : संजय देशपांडे

औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक भूखंड घेऊन ते हस्तांतरित करण्याचे ‘उद्योग’ सुरू आहेत. हे उद्योग लक्षात आणून दिल्यानंतरही सुजाता राऊत या महिला उद्योजिकेला चिकलठाणा वसाहतीत भूखंड द्यावा, अशी शिफारस परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील त्यास मान्यता दिली. ई-निविदा प्रक्रिया डावलून मंत्र्यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेला हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील पी-13 या 4,812 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडातून अतिउच्चदाबाची वीज वाहिनी गेली आहे. या जागेच्या बाजूला 350 चौ.मी.चा भूखंड वाटप करता येऊ शकतो, असे अभिप्राय देण्यात आले होते. ए. ए. चौधरी यांनी या भूखंडासाठी 2005 या वर्षी अर्ज केला, मात्र भूखंड वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर सुजाता राऊत यांनी या भूखंडासाठी अर्ज केला. महिला उद्योजिका असल्याने त्यांना भूखंड देण्याची शिफारस परिवहनमंत्री रावते यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे केली. राऊत यांना भूखंड देणे अयोग्य असल्याचा अभिप्राय प्रादेशिक अधिकार्‍यांनी दिला, मात्र हा भूखंड हस्तांतरित होणार नाही, अशी अट टाकून राऊत यांना 2016 मध्ये वाटप करण्यात आला. 

खंडपीठाचे ‘जैसे थे’चे आदेश, प्रतिवादींना नोटीस

सुजाता राऊत यांना 350 चौ.मी.च्या भूखंडाचे बेकायदा वाटप केल्याप्रकरणी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे तसेच ‘जैसे थे’चे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी दिले. निविदा न काढता करण्यात आलेले भूखंड वाटप रद्द करण्यात यावे, त्यावर होत असलेले बांधकाम रोखण्यात यावे अशी विनंती या संदर्भात दाखल याचिकेत करण्यात आली. या प्रकरणात उद्योगमंत्री, उद्योग सचिव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी आणि सुजाता राऊत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य शासन आणि मंत्र्यांच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख हजर झाले तर एमआयडीसीच्या वतीने अ‍ॅड. दंडे हजर राहिले. खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस काढून ’जैसे थे’चे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. कुणाल काळे, अ‍ॅड. देवांग देशमुख यांनी साह्य केले