Tue, Sep 17, 2019 03:44होमपेज › Aurangabad › कचराकोंडीचे हंड्रेड डेज

कचराकोंडीचे हंड्रेड डेज

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 26 2018 12:18AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

शहरातील कचराकोंडीला शनिवारी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या काळात कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिट्यात प्रचंड जाळपोळ, दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज बघायला मिळाला. याच कारणावरून मनपा आयुक्‍त आणि पोलिस आयुक्‍तांसारख्या दोन सनदी अधिकार्‍यांची उचलबांगडी झाली. त्यापाठोपाठ कचराप्रश्‍नात स्वतःला झोकून देऊन काम करणारे जिल्हाधिकारीही येथून बदलून गेले. दुसरीकडे औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून मनपाच्या विरोधात गार्बेज वॉक काढला, परंतु पुलाखालून एवढे सारे पाणी वाहून गेल्यानंतरही परस्थिती जैसे थेच आहे. कचरा प्रक्रिया यंत्रांची खरेदी निविदेत अडकली आहे. 

मनपाचा नारेगाव येथील जुना कचरा डेपो 16 फेब्रवारीपासून बंद झाला. तेंव्हापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. पालिकेने कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागांचा युद्धपातळीवर शोध घेतला, परंतु कांचनवाडी, मिटमिटा, सावंगी, चिकलठाणा अशा सर्व ठिकाणी मनपाला तीव्र विरोध झाला. आमचे नारेगाव करू नका असे म्हणत नागरिक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन धोरण ठरवित यापुढे राज्यात कचरा डेपोसाठी कुठेही जागा दिली जाणार नाही, असे जाहीर केले. सोबतच शासनाने शास्त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करूनच कचर्‍याची विल्हेवाट लावावी, असे आदेशही महानगरपालिकेला दिले. दरम्यान, पालिकेने तातडीने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 89 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला.

त्यास राज्य सरकारने मंजुरी देत ही संपूर्ण रक्‍कम शासनाच्या तिजोरीतून देण्यास मान्यता दिली. मार्च संपण्यापूर्वीच त्यातील 10 कोटी रुपये मनपाच्या बँक खात्यावर जमा झाले. त्यानंतर पालिकेने नऊ प्रभागांत बसविण्यासाठी 27 यंत्र खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. मात्र आता दोन महिने उलटले तरी ही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तात्पुरत्या स्वरूपात कंपोस्टिंग पीट उभारून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने पडेगाव, कांचनवाडी, हर्सूल आणि चिकलठाणा अशा शहराच्या चार दिशांना चार जागा निश्‍चित करून दिल्या आहेत. या चार जागांवर सध्या ओला कचरा नेऊन टाकण्यात येत आहे. सुक्या कचर्‍याचा प्रश्‍न मात्र थोडाही सुटलेला नाही. रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये शेकडो टन कचरा पडून आहे. 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex