Mon, Sep 16, 2019 06:27होमपेज › Aurangabad › एकाच खोलीत पहिली ते चौथी

एकाच खोलीत पहिली ते चौथी

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आधीच शहराच्या इज्जतीचा कचरा झाला आहे. त्यात आता मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (दि. 12) अचानक जुबलीपार्क येथील मनपाच्या उर्दू माध्यमाच्या शाळेची पाहणी केली असता, 1 ली ते 4 थी वर्ग एकाच खोलीत एकत्रित सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच 5 वी ते 7 वीचे वर्गही एकत्र भरविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकार विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याचा प्रकार असल्याने चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले. 

पाच महिन्यांपासून शहरातील नागरिक कचराकोंडीचा सामना करीत आहेत. त्यासोबत पाणी टंचाई, रस्ते, पथ दिवे आदी मूलभूत सुविधांबाबतही बोंबाबोंब आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांमधून नेहमीच संताप व्यक्‍त केला जातो. त्यात आता प्रशासनाने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही खेळ मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सकाळी महापौर घोडेले यांनी ज्युबलीपार्क येथील मनपा शाळेला अचानक भेट दिली. या ठिकाणी मराठी माध्यमाच्या 1 ते 8 वी आणि उर्दू माध्यमाच्या अनुक्रमे 1 ते 7 वी पर्यंतची शाळा भरते. तसेच पोलिस हेडक्वॉर्टरची शाळा याच ठिकाणी समायोजित करण्यात आली आहे.

यावेळी उर्दू माध्यमाच्या शाळेत 1 ली ते 4 थी चे विद्यार्थीं एकाच वर्गांत तर 5 वी ते 7 वीचे विद्यार्थीं दुसर्‍या एका वर्गांत बसविण्यात आल्याचे समोर आले. याबाबत मुख्याध्यापकांना जाब विचारला असता, त्यांनी केवळ दोनच शिक्षक असल्याचा खुलासा केला. त्यानंतर त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेची पाहणी केली. या ठिकाणी देखील 1 ली, 2 री व 3 री 4 थीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसविण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे महापौरांनी थेट आयुक्‍त डॉ. विनायक निपुण यांच्याकडे या गंभीर प्रकाराबाबत तक्रार केली. त्यांनी तातडीने शिक्षण विभागाची बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, येथील शाळा इतर ठिकाणी समायोजित केल्यानंतर पाच शिक्षक अतिरिक्‍त ठरतात, असे सांगण्यात आले. महापौरांच्या प्रश्नांना शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व मुख्याध्यापकांना कुठलेही समाधानकारकउत्तर देता आले नाही.