Wed, Jun 26, 2019 15:16होमपेज › Aurangabad › ‘फायरिंग फेम’ मेहताब अली जेरबंद

‘फायरिंग फेम’ मेहताब अली जेरबंद

Published On: Nov 02 2018 1:28AM | Last Updated: Nov 02 2018 1:26AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

टाऊन हॉल परिसरात 31 मेच्या मध्यरात्री रिक्षाचालकाला मारहाण करीत गावठी कट्ट्यातून पाच राउंड फायर करणार्‍या कुख्यात गुन्हेगाराला विशेष पथकाने गुरुवारी (दि. 1) अटक केली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात धुमाकूळ घातल्यामुळे दोन्ही राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर पाच महिन्यांनंतर तो पोलिसांच्या हाती लागला. मेहताब अली शौकत अली (30) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनात कारवाई

पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद रुजू झाल्यावर तिसर्‍याच दिवशी मेहताब अलीने गोळीबार करून त्यांना सलामी दिली होती. त्यामुळे हा गुन्हा निकाली काढण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांचे जनसंपर्क अधिकारी सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी उपायुक्‍त निकेश खाटमोडे यांच्या परवानगीने सापळा रचला. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनाही माहिती दिली. आरोपी रिक्षाने चेतक घोडा चौकात आला. पण, तेथे न थांबता तो श्रीराम मंदिराजवळ गेला. त्यानंतर पथकाने त्याला तेथे पकडले. ही कारवाई आडे, सोनवणे यांच्यासह पोलिस नाईक देवा सूर्यवंशी, सुकानंद पगारे, राम जल्हारे, अविनाश जोशी, सचिन नांगरे, चालक शेख यांच्या पथकाने केली.