Sat, Jul 04, 2020 20:55होमपेज › Aurangabad › धरण भरल्याने करमाडसह पंधरा गावांच्या पाणी टंचाईचे संकट दूर 

धरण भरल्याने करमाडसह पंधरा गावांच्या पाणी टंचाईचे संकट दूर 

Last Updated: Nov 06 2019 6:29PM

बनगाव (ता.औरंगाबाद) लहुकी माध्यम प्रकल्पात असलेला पंधरा गावांची टंचाईदूर करणारा  पाणीसाठा.करमाड : प्रतिनिधी

औरंगाबाद तालुक्यातील परिसरात यावर्षी सरासरी तुलनेने पावसाचे प्रमाण वाढलेले असून लाहुकी माध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने दरवर्षी पाणीटंचाई जाणणाऱ्या १५ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. यामुळे पाण्याअभावी पिकांना फटका व पिण्याच्या पाण्याची टंचाई असे दुहेरी संकट दूर झाले आहे. सध्या बनगाव लहुकी मध्यम प्रकल्प परतीच्या जोरदार झालेल्या पावसाने धरणातील पाणीपातळी वाढ होऊन मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने करमाडसह पंधरा गावांना पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे.

पावसाळ्यात करमाड परिसरात पाऊस न झाल्याने लाहुकी धरण कोरडेठाक होते. मात्र, आता परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह करमाड परिसरात जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे शेतीलील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. तसेच लहुकी मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

या मध्यम प्रकल्पातून करमाड, दुधड, गाढेजळगाव, शेवगा, भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर-गेवराई, वरुड, वरझडी, करंजगाव, मुरुमखेडा, वडखा, शेंद्राबन, या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पुर्ण क्षमतेने भरल्या आहेत. भर उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परिसरात परतीचा पाऊस हुलकावणी देत होता. कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणात पाणीसाठा अल्प प्रमाणात साठत होता. त्यामुळे धरणाखालील व लहुकी नदीवरील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ  होत नव्हती. पाण्याच्या कमीमुळे शेतकऱ्यांना एकेरी पिकांवर समाधान मानावे लागत होते. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने चांगला जोर धरल्याने शेतकऱ्यांच्या पुढील पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

लहुकी धरणातून पटाव्दारे दुधड, दुधडवाडी, भांबर्डा, शेवगा, गाढेजळगाव,  करंजगाव या गावांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवठा होत असतो. यावर्षी परिसरात प्रथमच चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. एकंदरीत सर्व गावांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार झोडपल्याने पिकांचे नुकसान झाले दुःखही आहे. मात्र अनेक वर्षानंतर चांगला पाऊस झाल्याने दुसरीकडे आनंदही व्यक्त होत आहे. 

प्रकल्पाची साठवण क्षमतेत वाढ

औरंगाबाद तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी मुरूमची गरज होती. आशा परिस्थितीत छोटे तलाव किंवा माध्यम प्रकल्पातील मुरुम काढून खोलीकरण करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार बनगांव माध्यम प्रकल्पातुन ५ एकर पेक्षा जास्त जागेतील वीस फूट खोल मुरुम समृद्धी महामार्गासाठी काढला होता. तर १९७२ नंतर पुन्हा प्रथमच या धरणाची खोलीकरण करण्यात आले होते. त्यामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे.