होमपेज › Aurangabad › आधी तयारी, मग अटक

आधी तयारी, मग अटक

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

क्रांती चौक ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार तथा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक करताना सोमवारी (दि. 21) पोलिसांनी प्रचंड सावधगिरी बाळगली. दंगल नियंत्रण पथकासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात केला. वज्र, वरुण ही वाहने बाहेर काढल्यानंतर जैस्वाल यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर शहरात पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेतल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. 

दंगलप्रकरणी अटक झालेल्या गांधीनगरातील दोन आरोपींना सोडा, असे म्हणत प्रदीप जैस्वाल यांनी क्रांती चौक ठाण्यात रविवारी रात्री 11 वाजता गोंधळ घातला. अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत खुर्च्यांची फेकाफेक केली. ठाणे अंमलदाराच्या टेबलवरील काच फोडली होती. तेव्हा ठाणेदाराने त्यांची समजूत घालून कार्यकर्त्यांसह तेथून घरी पाठविले. मात्र, हा प्रकार थेट पोलिसांनाच आव्हान ठरणारा असल्याने प्रभारी ठाणेदार विजय घेरडे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ठाणे अंमलदाराच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे, गोंधळ घालणे, शिवीगाळ करून धमकावणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांनुसार जैस्वालयांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.  सोमवारी दुपारी 12 वाजता वरिष्ठ अधिकार्‍यांची क्रांती चौक ठाण्यात बैठक झाली.

उपायुक्‍त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्यासह सहायक आयुक्‍त आणि सर्व पोलिस निरीक्षकांची यावेळी हजेरी होती. याशिवाय एसआरपीएफ, दंगा काबू पथक, वज्र वाहन आदी ठाण्याच्या परिसरात तैनात करण्यात आले. अटकेचे नियोजन ठरल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, अनिल आडे, राठोड यांच्यासह विशेष शाखेचे परदेशी हे जैस्वाल यांच्या घरी गेले. त्यांनी जैस्वाल यांना ठाण्यात हजर होण्यास सांगितले. त्यावर स्वतःच्या वाहनाने जैस्वाल ठाण्यात आले. उपायुक्‍तांसमोर हजर होताच दुसर्‍या कक्षात अटकेची कागदोपत्री कारवाई करण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांना न्यायालयात हजर केले. तोपर्यंत अटक आहे मात्र जामीन मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने जैस्वाल यांची रवानगी थेट हर्सूल कारागृहात केल्याने शहरात पुन्हा बंदोबस्त वाढविण्यात आला. 

महापौर, जिल्हा प्रमुखाची धावाधाव

प्रदीप जैस्वाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच महापौर नंदकुमार घोडेले, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांची धावपळ झाली. जैस्वाल यांना न्यायालयात हजर करताना हे सर्वजण सोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी न्यायालयातही तगडा बंदोबस्त तैनात केला होता.