होमपेज › Aurangabad › "आता तर मीच बॉस, गटबाजीचा प्रश्‍नच नाही"

"आता तर मीच बॉस, गटबाजीचा प्रश्‍नच नाही"

Published On: Jan 24 2018 10:19AM | Last Updated: Jan 24 2018 10:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आता कसली गटबाजी? आता मीच बॉस. त्यामुळे स्थानिक पातळीवर गटबाजीचा प्रश्‍नच नाही. मीही सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीचे काम करेन. कुणीही गटबाजी करणार नाही, असे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेनेच्या मुंबईत पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत खासदार खैरे यांची नेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी औरंगाबादेत परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक पातळीवर शिवसेनेत खैरे समर्थक आणि खैरे विरोधक असे दोन गट सक्रिय आहेत. त्याविषयी विचारले असता खैरे म्हणाले, आता मी नेता बनलो आहे. त्यामुळे इथे मीच बॉस आहे. गटबाजीचा प्रश्‍न येणारच नाही. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंसमोर सांगितले, आता सर्वांनी सोबत काम करायचे आहे. कुणी नाराज असेल तर नेता म्हणून त्यालाही सोबत घेण्याची माझी तयारी आहे. जे बाहेर गेलेत त्यांनाही परत आणण्याचा प्रयत्न राहील. सहा महिन्यांत पक्ष संघटनेत बदल दिसेल, असा दावाही खैरे यांनी केला.

तेव्हा मोदी कुठे होते?

खैरे यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांवरही जोरदार टीका केला. ते म्हणाले, मी मागील निवडणुकीत युतीचा खासदार म्हणून निवडून आलो, हे मी मान्य करतो. पण भाजपचे काही नेते मी मोदी लाटेमुळेच विजयी झाल्याचा दावा करतात तो सर्वस्वी चुकीचा आहे. आधीच्या निवडणुकांमध्ये मी पहिल्या निवडणुकीत बॅरिस्टर अंतुलेंना हरविले, त्यानंतर रामकृष्ण बाबांना हरविले, नंतरच्या निवडणुकीत शांतिगिरी महाराजांचाही पराभव केला. त्यावेळी मोदी थोडेच होते. मागील निवडणुकीत मोदींमुळे माझी दहा टक्के मते वाढली असतील हे मला मान्य आहे, परंतु ती दहा टक्के मते वजा केली तरी माझा विजय निश्‍चितच होता.