Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Aurangabad › उद्योजकांचा निर्णय : हल्लेखोरांना नोकर्‍या नाही

उद्योजकांचा निर्णय : हल्लेखोरांना नोकर्‍या नाही

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक वसाहतीत धुडगूस घालणार्‍या हल्लेखोरांना कंपनीत नोकर्‍या दिल्या जाणार नाहीत; तसेच हल्लेखोर जर कर्मचारी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी शुक्रवारी (दि. 10) सांगितले.

तोडफोडीच्या निषेधार्थ मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये झालेल्या उद्योजकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भोगले म्हणाले की, औद्योगिक वसाहतीत धुडगूस घालणार्‍यांची ‘सीसीटीव्ही’द्वारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

ओळख पटलेल्यांना नोकर्‍यांसाठी उद्योगांची दारे कायमची बंद असतील. तोडफोड करणार्‍या जमावात कंपनीचे कर्मचारी असतील, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. औद्योगिक वसाहतीची शांतता भंग करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जाईल. कंपन्यांवर झालेले हल्ले अतिरेकी स्वरूपाचे असल्याने तोडफोडीचे चित्रीकरण पोलिसांकडे सोपविले जाईल. 

मराठा समाजाचा उद्रेक नाही

उद्योगांवर झालेले हल्ले हा मराठा समाजाचा उद्रेक नव्हे, तर पूर्वनियोजित कट होता. हे हल्ले घडविण्यामागे कोणी तरी निश्‍चितपणे प्रयत्न केले आहेत. असे प्रयत्न यापुढे होऊ नयेत, यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले.