Sat, Jul 04, 2020 04:17होमपेज › Aurangabad › मौजमजेसाठी घरे फोडणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मौजमजेसाठी घरे फोडणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 30 2018 12:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

दिवसा रिक्षा चालवायची... रात्री दारू प्यायची अन् जवळचे पैसे संपले की, चोर्‍या करायच्या... केवळ मौजमजेत पैसा उधळायचा... अशाच पद्धतीने शहरात घरफोडीचे गुन्हे करणार्‍या टोळीचा मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (दि. 29) पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, चोरी करण्यासाठी ते चोरीच्याच दुचाकीवरून फिरायचे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

अनिकेत रावसाहेब हिवाळे (20, रा. जय भवानीनगर) आणि विलास हरी लांडगे (21, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी चोरांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार हारूण शेख यांनी सांगितले की, प्लंबरचे काम करणारे रामहरख रामविलास प्रजापती (42, रा. उत्तरप्रदेश, ह. मु. राजनगर, मुकुंदवाडी) हे 15 एप्रिल रोजी सहकुटुंब मूळगावी गेले होते. त्यांचे घर फोडून चोरट्यांनी पंधरा हजारांची रोकड, 22 ग्रॅमचे नेकलेस, 11 ग्रॅमचे मंगळसूत्र, प्रत्येकी दहा ग्रॅमची सोनसाखळी आणि कानातील झुंबर लंपास केले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात रेकॉर्डवरील अनिकेत हिवाळे आणि विलास लांडगे यांनी हे घर फोडल्याचे समोर आले.

त्यानंतर सहायक फौजदार हारूण शेख, कौतिक गोरे, कॉन्स्टेबल शेख असलम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, सोमकांत भालेराव यांच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली. सुरुवातीला टाळाटाळ करणार्‍या चोरट्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 22 ग्रॅम सोन्याचे नेकलेस, एक दुचाकी, तीन मोबाइल, असा एक लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय आरोपी हिवाळे आणि लांडगे यांनी गर्दीत तीन मोबाइल आणि पुंडलिकनगर भागातून फेब्रुवारी महिन्यात एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींना 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.