होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : महापालिका आयुक्‍तांच्या दालनात ठेकेदारांचा ठिय्या

औरंगाबाद : महापालिका आयुक्‍तांच्या दालनात ठेकेदारांचा ठिय्या

Published On: Feb 26 2019 2:08PM | Last Updated: Feb 26 2019 1:16PM
औरंगाबाद :  प्रतिनिधी

मनपाकडून विकास कामांची बिले मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी सोमवारपासून (ता.२५)आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आयुक्‍त डॉ. निपुण विनायक हे अजून मुख्यालयात आलेले नाहीत. आयुक्‍तांनी येऊन चर्चा करावी तसेच थकीत बिले कधी अदा करणार हे स्पष्ट करावे, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका आंदोलक ठेकेदारांनी घेतली आहे. 

महानगरपालिकेकडे सध्या ठेकेदारांची सुमारे २०९ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले मिळावीत यासाठी ठेकेदार बर्‍याच दिवसांपासून पालिकेत रोज चकरा मारत आहेत. या मागणीसाठी ठेकेदारांनी आतापर्यंत दोन वेळा आंदोलन केले. एवढेच नाही तर आमची बिले न काढल्यास मनपा मुख्यालयासमोर विष घेऊन आत्महत्या करू, असा इशाराही दिला होता. त्यावेळी महापौरांनी ठेकेदारांना लवकरच बिले काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरही प्रतिसाद न मिळालेला नाही. त्यामुळे संतप्‍त झालेले सुमारे शंभर ठेकेदार सोमवारी सकाळी आकरा वाजताच मनपा मुख्यालयात दाखल झाले. 

या सर्वांनी पालिका आयुक्‍तांचे दालन गाठून या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आयुक्‍त निपूण हे दुपारपर्यंत मनपा मुख्यालयाकडे फिरकलेले नाहीत. आता आयुक्‍तांनी येऊन बिले कधी काढण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, त्यानंतरच हे आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे.