Sat, Aug 24, 2019 10:37होमपेज › Aurangabad › धक्कादायक; दंगल पूर्वनियोजितच, राजकीय गटावर संशय!

औरंगाबाद दंगल पूर्वनियोजितच पोलिसांचा संशय!

Published On: May 18 2018 1:02PM | Last Updated: May 18 2018 1:02PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

दोन दिवसांच्या दंगलीनंतर औरंगाबाद शहर आता पुर्वपदावर आले आहे. शहरात झालेल्या या दंगलीबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. किरकोळ कारणावरून घडलेली दंगल पूर्वनियोजित होती, असा संशय असल्याचा दावा डीजीपी कार्यालयाने केला आहे. या संदर्भातील एक अहवाल तयार करण्यात आला आहे. 

औरंगाबादमध्ये ११ आणि १२ मे रोजी अनधिकृत नळ कनेक्शन तोडल्याच्या  किरकोळ कारणातून दोन गटात वाद झाला होता. क्षणार्धात या वादाने दंगलीचे रूप धारण केले. दंगलीत झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत दोघांचा मृत्यू झाला होता. किरकोळ कारणावरून इतक्या मोठ्या प्रमाणात शहर पेटून उठणे शक्य नसल्याने या दंगलीमागे राजकीय लोकांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी अहवालात  म्हटले आहे. 

किरकोळ वादात राजकीय हस्तक्षेप झाला आणि दंगल उसळली, असा संशय आम्हाला आहे. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित असल्याच्या संशय बळावत आहे असेही या अहवालात म्हटले आहे. 

दंगल शिवसेनेने घडवली; लच्छू पैलवान दंगलीचा ‘मास्टरमाईंड’

जुन्या औरंगाबादेतील दंगल पूर्वनियोजित कट होता. त्यासंबंधी पुरावे माझ्याकडे असून शिवसेना नेता स्वतः जाळपोळ करीत असल्याचा व्हिडिओही आहे. हे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील. त्यांनी कारवाई केली तर ठीक, नसता आम्ही न्यायालयात जाणार, असा इशारा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

जलील यांनी शिवसेनेवर दंगल घडविल्याचा आरोप केला. ही दंगल धार्मिक नसून निवडणुका जवळ आल्याने आणि गुंडागर्दीच्या वर्चस्वावरून घडल्याचे ते म्हणाले. लच्छू पहेलवाल या दंगलीच्या मागील मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप आ. जलील यांनी केला.