Wed, Jun 03, 2020 18:08होमपेज › Aurangabad › चोर समजून मारहाण; एकजण मृत्युमुखी

चोर समजून मारहाण; एकजण मृत्युमुखी

Published On: Feb 28 2018 2:23AM | Last Updated: Feb 28 2018 2:18AMऔरंगाबाद  :प्रतिनिधी

इज्तेमात स्वयंसेवक म्हणून बंदोबस्त करणार्‍या काही मुलांनी चार ते पाच जणांना चोर समजून बेदम मारहाण केली. हात-पाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. यात एकाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असून मृताची ओळख पटलेली नाही. वाळूज पोलिस अधिक तपास करीत आहेत. मंगळवारी (दि. 27) हा प्रकार समोर आला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुप्तता बाळगली असून पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. वरिष्ठांना विचारल्याशिवाय सांगणे उचित ठरणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मुबारक हसन तांबोळी (34, रा. जोगेश्‍वरी भगतसिंग नगर, तिवारी गल्ली, मुंबई), अन्वरखान इमामखान (39, रा. भवानी पेठ, काशीवाडी, आदर्श मित्र मंडळजवळ, पुणे) आणि शेख अकिल ऊर्फ सालणरोटी शेख महंमद इस्लाम (18, रा. मालेगाव, नाशिक) अशी जखमींची नावे असून त्यांच्यासह मृत झालेल्या 60 वर्षीय इसमाला इज्तेमातील जमावाने चोर समजून मारहाण केली. 25 फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजता खिदमदगार असलेल्या तरुणाने हा प्रकार वाळूज ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार टाक यांना कळविला. त्यांनी उपनिरीक्षक अमित बागूल यांना घटनास्थळी पाठविले. पार्किंग क्र. 99 च्या बाजूला असलेल्या दोन पडक्या खोलीत डांबून ठेवलेल्या लोकांना त्यांनी पाहिले. ते जखमी असल्याचे लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले. दरम्यान, एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.