Sat, Aug 24, 2019 10:22होमपेज › Aurangabad › 523 क्‍विंटल मालाची ऑनलाइन विक्री

523 क्‍विंटल मालाची ऑनलाइन विक्री

Published On: Mar 13 2018 1:47AM | Last Updated: Mar 13 2018 1:38AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या ई-नाम प्रणालीस खर्‍या अर्थाने सोमवारपासून (दि. 12) प्रारंभ झाला. ई-लिलाव पद्धतीने बाजार समितीने 523 क्‍विंटल शेतमालाच्या 106 वक्‍कलची (लॉट) ऑनलाइन विक्री केली. शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने केंद्रावर माल आणला आणि खरेदीदारांनीही विरोध न करता ऑनलाइन पद्धतीच्या लिलावात सहभाग नोंदवला, हे विशेष.औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा देशातील ई-नाम प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या बाजार समित्यांमध्ये नंबर लागला. मात्र, बाजार समितीची संथगती आणि अडत, खरेदीदारांचा पूर्वग्रह दूषितपणे योजनेला असलेला विरोध, यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीस सहा महिने विलंब झाला.

नऊ फेबु्रवारीला औपचारिक उद्घाटन करण्यात आल्यानंतरही लीझ लाईनसह अनेक त्रुटी राहिल्या होत्या. आजही बाजार समितीकडून यंत्रणा पूर्ण ताकदीने सुरू करण्यात आलेली नसली तरी सकारात्मक सुरुवात झाली आहे. त्यास शेतकरी, खरेदीदारांचा प्रतिसादही मिळाला. पहिल्या दिवशी 523 क्‍विंटल शेतीमालाची ई-नाम प्रणालीद्वारे विक्री करण्यात आली.

कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील शेतकरी सुनील शिंदे व हर्सूलचे शेतकरी देवराव औताडे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, सचिव विजय शिरसाट, सहायक सचिव के. आर. चव्हाण, डी. पी. देशपांडे, सिद्धेश त्रिवेदी, एस. ए. सोनवणे यांच्यासह शेतकरी, अडतदार, खरेदीदार, व्यापार्‍यांची उपस्थिती होती. 

पहिलाच दिवस असल्याने ई-नामचा वापर कसा करावा, ई-लिलावात बोली कशी लागावी, हे समजण्यास उशीर लागला. सहा महिन्यांत भाजीपाल्याची विक्रीही ई-नामअंतर्गत केली जाईल, असे पठाडे यांनी सांगितले.