Sun, Aug 18, 2019 07:15होमपेज › Aurangabad › शंभर कोटींचे रस्ते असुरक्षित

शंभर कोटींचे रस्ते असुरक्षित

Published On: Feb 11 2019 1:46AM | Last Updated: Feb 11 2019 1:46AM
सुनील कच्छवे : औरंगाबाद 

शासन निधीतील शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामांना दीड वर्षानंतर नुकतीच सुरुवात झाली, परंतु या रस्ते कामात दुभाजक, फुटपाथ तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीचे साईड ड्रेन यासारख्या कामांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात नुसतेच बोडखे रस्ते होणार आहेत.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे रस्त्यांची कामे करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही. त्यामुळे मनपाकडून सातत्याने शासनाकडे निधीची मागणी होत आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2017 मध्ये मनपाला सिमेंट रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून पालिकेने 31 रस्ते तयार करण्याचे ठरविले. पुढे वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची निविदा प्रक्रिया रखडली. आता अखेर दीड वर्षाच्या विलंबनानंतर नुकतेच 3 जानेवारी 2019 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या रस्ते कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला. 

आता या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. परंतु या रस्त्यांच्या कामात दुभाजक, फुटपाथ तसेच रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी साईड ड्रेन अशा कोणत्याच कामांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शासन निधीतील केवळ बोडखे रस्तेच बनविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संख्या वाढविण्यासाठी फंडा

परिपूर्ण रस्ते करण्यासाठी जास्तीचा खर्च लागतो. शंभर कोटींतून असे परिपूर्ण रस्ते बनवायचे ठरले असते तर 31 पेक्षा कमी रस्ते झाले असते. म्हणून रस्त्यांची संख्या वाढविण्यासाठीच मनपातील सत्ताधार्‍यांनी फुटपाथ, साईड ड्रेन आणि दुभाजकांच्या कामांचा यात समावेश टाळल्याचे समजते.