Sun, Feb 24, 2019 02:52होमपेज › Arthabhan › ब्लॉग: ...आला करकपातीचा हंगाम

ब्लॉग: ...आला करकपातीचा हंगाम

Published On: Feb 12 2018 1:38AM | Last Updated: Feb 12 2018 9:56AMचंद्रशेखर चितळे

आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही म्हणजे नोकरदारांसाठी करकपातीचा काळ. वजावटीच्या रकमकेवरून ऑफिसमध्ये उडणारे खटके आणि चहाच्या कपाभोवती उडणार्‍या गुंतवणुकीच्या गप्पा हे चित्र सर्रास दिसते. जानेवारीची तिमाही हा पगारामधील करकपातीचा हंगाम समजला जातो ही चुकीची कल्पना आहे. करकपात हे वर्षभर पाळायचे व्रत आहे. मालकवर्ग आणि कर्मचारी या दोन्ही घटकांनी पगारामध्ये करकपातीच्या तरतुदींची माहिती घेऊन त्याचे पालन केल्यास दोघांनाही त्याचा लाभ होतो. 

पाहूयात काय आहे हा पगारामधील करकपातीचा कायदा.

पगारामधून करकपात :
कर्मचार्‍याचा पगार करपात्र असल्यास, आयकराची देय रक्‍कम वर्षभरामध्ये पगाराच्या समप्रमाणात कपात करण्याची प्रत्येक मालकावर जबाबदारी आहे. म्हणजेच जानेवारीची तिमाही हा पगारामधील करकपातीचा हंगाम समजला जातो ही चुकीची कल्पना आहे. करकपात हे वर्षभर पाळायचे व्रत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस कर्मचार्‍याचा पगार, त्याला देण्यात येणार्‍या सोयीसवलती, प्राप्त वजावटी यांचा हिशेब करुन येणार्‍या उत्पन्नावरील देय आयकराची रक्‍कम ठरवावी लागते. एकंदर रक्‍कम, जसजसा पगार अदा केला जातो तशी समप्रमाणामध्ये कपात करावी लागते. 

वर्ष जसे पुढे सरकते तसे सुरुवातीचे अनुमान आणि प्रत्यक्ष पगाराच्या रकमेमध्ये तफावत पडू शकते. याची कारणे म्हणजे अंदाजापेक्षा झालेली कमी-अधिक पगारवाढ, वजावट, गुंतवणुकीच्या रकमेमधील चढ-उतार इत्यादी. आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत पर्याप्त एकंदर कर संपूर्ण वजावट करण्याची जबाबदारी मालकावर असते. त्यासाठी वजावटीची रक्‍कम वाढवण्याचा किंवा घटवण्याचा अधिकार मालकास बहाल केला आहे. म्हणूनच, साधारणत: जानेवारी महिन्यापासून पगारापासून करावयाच्या करकपातीवर मालकवर्गाचे बारकाईने लक्ष असते. 

कर्मचार्‍यांनी घ्यावयाची काळजी :

योग्य रकमेची पगारामधून करकपात व्हावी यासाठी कर्मचार्‍यांनी देखील काळजी घेेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी पुढील गोष्टींची खबरदारी घ्यावी. 
1) 
डिसेंबर अखेरीपर्यंत मिळालेल्या पगाराची आणि करकपातीच्या रकमेची कार्यालयांमध्ये योग्य नोंद झाली असल्याची तपासणी करणे.
2) 
पगाराची रक्‍कम तपासताना गाडी, निवासी घर इत्यादी सोयीसवलतींचे मूल्यांकन नियमानुसार असल्याची खात्री करणे.
3) 
मिळणार्‍या भत्त्यांसाठी उपलब्ध वजावटींची रक्‍कम योग्य रितीने ठरवल्याचे तपासणे.
4) 
घरभाडे भरत असल्यास भाड्याचा करार किंवा भाडे पावतीची प्रत कार्यालयास देणे. 
5) 
औषधोपचारासाठी रुपये 15,000 पर्यंत वार्षिक वजावट उपलब्ध असते. त्यासाठी औषध-पाण्यावर झालेल्या खर्चाचा तपशील आणि पुरावा मालकाकडे देणे.
6) 
सुट्टीमधील व प्रवासासाठी मिळणारा भत्ता करमुक्त असतो. परंतु, त्यासाठी प्रवासखर्चाच्या पावत्या कार्यालयामध्ये दाखल करणे आवश्यक असते. निवासाच्या आणि खाण्या-पिण्याच्या खर्चाची वजावट मिळत नाही. 
7) 
घर खरेदीसाठी कर्ज घेतले असल्यास कर्जाची परतफेड आणि व्याजाची रक्कम कार्यालयास कळवणे. 
8) 
राष्ट्रीय पत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी,विम्याचा हप्ता, युएलआयपी, मुलांची शैक्षणिक शुल्क इत्यादी मान्यताप्राप्त गुंतवणूक केल्यास करपात्र उत्पन्नामधून 1,50,000 रुपयांपर्यंत वजावट प्राप्त होते. यासंबंधी माहिती कार्यालयास देणे.
9) अज्ञान मुलांचे व्याज, स्वत:चे मिळणारे व्याज असे उत्पन्न देखील कळवल्यास त्यावरील कर भरला जातो आणि नंतर पडणारा भुर्दंड टळतो. 
10) आरोग्यासंबंधी विमा उतरवला असल्यास त्याची माहिती वरील माहितीची मूळ प्रत देण्याची कायद्यानुसार गरज नाही.

आगामी तिमाही :
1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे उत्पन्न करपात्र असते. त्यामुळे आपला मार्च अखेरीच्या तिमाहीसाठी मिळणारा पगार आणि वजावटी गृहीत धरलेल्या असतात. प्रत्यक्ष पगार किंवा वजावटीच्या रकमेमध्ये अनुमानापेक्षा फरक पडल्यास कर्मचार्‍याने तो त्वरित कार्यालयाच्या निदर्शनास आणावा. त्यायोगे करकपातीच्या रकमेमध्ये बदल करणे शक्य होते. गुंतवणूक, विम्याचा हप्ता भरणे यासाठी 31 मार्चची वाट न पाहता लगेचच पूर्तता करणे हितावह ठरते. 

करकपातीची माहिती :
झालेल्या करकपातीची माहिती आयकर खात्याच्या संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध असते. करदात्यांनी या संगणक प्रणालीवर नोंदणी केल्यास त्याच्या उत्पन्नामधून झालेली करकपात, भरलेला आयकर याची सविस्तर माहिती मिळू शकते. पगारदार व्यक्तींनी या सोईचा लाभ देण्यासाठी आपली नोंदणी अवश्य करावी. त्यामुळे भरलेल्या आयकराची रक्‍कम बरोबर असल्याची खात्री करता येते. त्रुटी आढळल्यास लगेच पावले उचलून तिचे निवारण करता येते.

देणगीची वजावट :
मान्यतापात्र सामाजिक, धर्मादाय, शैक्षणिक इत्यादी संस्थांना देणगी दिल्यास वजावट मिळते. एकंदर कमाल देणगीवर ढोबळ करपात्र उत्पन्नाच्या 10 टक्क्यांची मर्यादा आहे. देणगीच्या 50 टक्के रक्कम करपात्र उत्पन्नामधून वजा केली जाते. परंतु, देणगीच्या वजावटीचा विचार पगारामधील करकपातीसाठी घेता येत नाही. अशी वजावट कर्मचार्‍यांनी आपल्या विवरण पत्रकामध्ये दाखवावी लागते. 

व्याजाची वजावट : 
कलम 80 सी नुसार सार्वजनिक भविष्य निधीमध्ये जमा केलेल्या रकमेची वजावट प्राप्त होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीपीएफ) प्रत्येक वर्षी व्याज जमा केले जाते. व्याजाची रक्कम हे खातेदाराचे उत्पन्न आहे. ते करमुक्त आहे. त्यामुळे, त्यावर आयकर भरावा लागत नाही.  व्याजाची रक्कम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणजेच व्याजाच्या जमा झालेल्या रकमेवर देखील कलम 80 सी अंतर्गत वजावट प्राप्त होऊ शकते. या वजावटीचा देखील कर्मचार्‍यांनी लाभ घेणे आवश्यक आहे. 

प्रमाणत्र :
आर्थिक वर्ष संपल्यानंतर 15 जूनपर्यंत कर्मचार्‍यास पगारामधील करकपातीचेे फॉर्म क्र. 16 मध्ये प्रमाणपत्र मिळते. यामध्ये करपात्र आणि करमुक्त, पगार, वजावटी आणि करकपातीच्या रकमेचा तपशील असतो. परंतु, नियमानुसार आयकर खात्याच्या संगणक प्रणालीमध्ये जमा दाखवलेल्या आयकराच्या रकमेचाच विचार  केला जातो. 

दर, व्याज :

पगारामधील करकपातीची रक्‍कम योग्यप्रकारे कपात न केल्यास अथवा उशिरा भरल्यास द.म. एक टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. असे व्याज वजावटीस पात्र ठरत नाही. करकपातीचे विवरणपत्रक, प्रमाणपत्रक उशिरा दिल्यास प्रती दोन रुपये 100 एवढा दंड आकारला जाऊ शकतो. मालक वर्गाने करकपातीच्या कायद्याचे नियमित पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. 

सारांश :
मालकवर्ग आणि कर्मचारी या दोन्ही घटकांनी पगारामध्ये करकपातीच्या तरतुदींची माहिती घेऊन त्याचे पालन केल्यास दोघांनाही त्याचा लाभ होतो. यासंबंधी कोणतीही शंका असल्यास कंपनीच्या चार्टर्ड अकौंटंटकडून शंका निरसन लगेचच करून घेतल्यास कटू परिणाम टळतात.