Sun, Feb 24, 2019 02:47होमपेज › Arthabhan › सावधपणे खरेदी-विक्री करावी 

सावधपणे खरेदी-विक्री करावी 

Published On: Feb 12 2018 1:38AM | Last Updated: Feb 12 2018 1:38AMअर्थसंकल्पातील दीर्घमुदती भांडवली नफ्यावरील करामुळे, बाजाराला जो विजेचा झटका बसला आहे त्यातून तो अजून सावरलेला नाही. अधूनमधून जरी निर्देशांक आणि थोडे वर गेले तरी एकूण कल मंदीचाच आहे. त्यामुळे कंपन्यांच्या त्रैमासिक कामगिरीवर त्या त्या शेअर्समध्ये भाववाढ होईल. त्यावर समाधान मानायचे सध्या दिवस आहेत आणि त्रैमासिक कामगिरी चांगली दिसली तरी विश्‍लेषक व दलाल डाऊ जोन्स आणि अन्य देशातील निर्देशांकाकडे बोट दाखवून सध्याच्या मंदीचे समर्थन करीत आहेत.

त्यातल्या त्यात रेन इंडस्ट्रीज, स्टरलाईट टेक्नॉलॉजीस व बजाज फायनान्स सध्याच्या भावाला विकत घेण्याजोगे वाटत आहेत. बजाज फायनान्सची जास्त माहिती पुढे ‘चकाकता हिरा’मधून दिली आहे. डिसेंबर 2017 तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचा नक्‍त नफा 230 कोटी रुपये झाला. गेल्या डिसेंबरपेक्षा तो 11% ने जास्त आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा तोटा वाढून 596 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. 

कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनची या तिमाहीची विक्री 1417.33 कोटी रुपये होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती 1157.58 कोटी रुपये होती. यावेळी नक्‍त नफा 75.23 कोटी रुपये होता. डिसेंबर 2016 तिमाहीसाठी तो 57.14 कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 30.69 कोटी रुपये आहे. दीपक  फर्टिलायझर्स व केमिकल्सची या तिमाहीची विक्री 1644.92 कोटी रुपये होती. करोत्तर नफा 56.97 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 6.41 रुपये होते. 

एक्सेल क्रॉप केअरची डिसेंबर 2017 ची तिमाही विक्री 258.65 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 12.88 कोटी रुपये होता. डिसेंबर 2016 तिमाहीचे हे आकडे अनुक्रमे 178.20 कोटी रुपये होते व करोत्तर नफा 2.68 कोटी रुपये होत. यावेळी नफ्यात जवळजवळ पाचपट वाढ आहे. तिचे भागभांडवल 5.503 कोटी रुपये आहे. 

स्टायलँड इंडस्ट्रीज या शोभिवंत लाकडाच्या कंपनीची यावेळची विक्री 81.87 कोटी रुपये होती व नक्‍त नफा 4.535 कोटी रुपये होता. तिचे भागभांडवल 8.166 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2016 तिमाहीची विक्री 69.88 कोटी रुपये होती व नक्‍त नफा 4.05 कोटी रुपये होता. फेडरल गुगल गोएट्झ (इंडिया)ची या तिमाहीची विक्री 313.25 कोटी रुपये होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती 292.69 कोटी रुपये होती. नक्‍त नफा या दोन डिसेंबरसाठी अनुक्रमे 15.486 कोटी रुपये व 11.42 कोटी रुपये होत. तिचे भागभांडवल 55.63 कोटी रुपये आहे. मुथुट फायनान्सचे डिसेंबर 2017 तिमाहीचे व्याज उत्पन्न 1553.71 कोटी रुपये होते. डिसेंबर 2016 च्या तिमाहीचे उत्पन्न 1340.85 कोटी रुपये होत. या दोन्ही तिमाहीसाठीचा नक्‍त नफा अनुक्रमे 463.65 कोटी रुपये व 291.06 कोटी रुपये होता. यावेळी नफ्यात 60 टक्के वाढ आहे. सध्याच्या 422 रुपये भावाला हा शेअर होण्याजोगा आहे. गेल्या बारा महिन्यांतील शेअरचा कमाल भाव 525 रुपये होता व किमान भाव 325 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 14.09 पट दिसते. बजाज फायनान्सपेक्षा हा शेअर स्वस्त वाटतो. सध्या खरेदी केला तर वर्षभरात 33 टक्के नफा मिळेल. जानेवारी 2019 ला संभाव्य भाव पुनः 525 रुपये व्हावा. 

केंद्र सरकारने साखरेवरील सीमाशुल्क 100 टक्के केल्याने सर्व साखर कंपन्यांचे शेअर्स आता घेण्यायोग्य झाले आहेत. उगार शुगर सध्या 22.50 रुपयांच्या जवळपास मिळत आहे. या भावाला किं/गुणोत्तर 10.8 पट दिसते. कंपनीच्या शेअरचा कमाल भाव गेल्या वर्षभरात 38.85  रुपये होता. त्यामुळे सध्या शेअर घेण्याजोगा आहे. 

बलरामपूर चिनी सध्या 120 रुपयाला मिळत आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 182 रुपये व 105 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/गुणोत्तर फक्‍त पाचपट आहे. तसेच डालमिया भारत शुगर ही 105 रुपयाला मिळत आहे. या भावाला किं/गुणोत्तर फक्‍त 4,952 आहे. रोज 3 लक्ष शेअर्सच्या आसपास व्यवहार होतो. शेअरचा कमाल व किमान भाव अनुक्रमे 198 व 98 रुपये होता. 

शेअर बाजारात मंदीचे सावट दिवसेंदिवस वाढत जाईल. पण हीच संधी खरेदीसाठी योग्य आहे. सध्यापेक्षा भाव 5 ते 10 टक्के कमीही होऊ शकतील. पण ते घसरतील व मग आपण ते घेऊ, अशी शेख महंमदी स्वप्ने न रंगवता सध्या टप्प्याटप्याने खरेदी करायला हरकत नाही. 

ज्या उद्योगात भाववाढीची संधी आहे. त्यात ग्राफाइट कंपन्या, पोलाद कंपन्या (रेन इंडस्ट्रीज, अपोलो पाईप्स, गोदावरी पॉवर वगैरे) यात गुंतवणूक श्रेयस्कर ठरेल. मात्र भाववाढीसाठी किमान ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागेल. दीर्घ मुदती भांडवल नफ्यातील कराचा जो मिठाचा खडा अर्थमंत्र्यांनी टाकला आहे. त्यामुळे शेअर बाजाराला विरजण मिळाले आहे. जर हा कर 7.5 टक्क्यांपर्यंत व शक्यतर 5 टक्क्यांपर्यंत आणला तर निवेशकांना काहीतरी न्याय मिळेल. शेअर बाजारात घसरण झाली तर विदेशी कंपन्या विक्री करू लागतात व भांडवली बाजाराला धक्‍का लागतो. भांडवल अटळ तरच गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था गतीला लागते. दुर्दैवाने रिझर्व्ह बँकही नेहमीप्रमाणे  महागाई वाढेल. महागाई वाढेल असा जपमाळ घेऊन बसली आहे. ती तर व्याजदर वाढवायचाही पवित्रा घेऊ शकेल. त्यामुळे अर्थव्यवस्था साडेसात टक्के वा त्याहून वाढण्याचे स्वप्न हे स्वप्नरंजन ठरणार आहे. 

अशावेळी सावधानतेने खरेदी करणे, निराश होऊन विक्री न करणे हे महत्त्वाचे आहे. क्या खाओ तो गम खाओ असे म्हणत फक्‍त च्युइंग गमच सध्या चघळत बसावा. कधीतरी अरुणोदय होईल व खराच प्रकाश पडेल, असे म्हणत सध्या हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणे. शेअर बाजार पावसाळ्याच्या दरम्यान सुधारेल. यंदा पावसाळा समाधानकारक असल्याचे संकेत जपानमधील शास्त्रज्ञांनी दिले आहे. ते खरे झाले की पुन्हा तेजी येईल.

डॉ. वसंत पटवर्धन