Sat, Sep 21, 2019 06:24होमपेज › Arthabhan › बाळंतपणासाठी विमा कवच घेताना

बाळंतपणासाठी विमा कवच घेताना

Published On: Jun 10 2019 1:25AM | Last Updated: Jun 10 2019 1:25AM
अर्पणा देवकर 

बाळंतपणाचाही लाभ देणारी आरोग्य विमा पॉलिसी ही देखील सर्वांसाठी उपयुक्त ठरते. अर्थात विमा खरेदी करताना त्याच्या वेटिंग पिरीयडसह अन्य गोष्टींची माहिती घेणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास कदाचित नुकसानही सोसावे लागेल. दोन ते चार वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतरच बाळंतपणाचा लाभ आरोग्य विम्याद्वारे घेता येते. तब्बल दहा लाखांपर्यंतचे विमा कवच बाळंतपणाच्या पॉलिसीत घेता येते. 

सर्व विम्यावर बाळंतपणाचा लाभ नाही

आरोग्य विमा योजना अनेक प्रकारच्या असतात. साधारणत: आरोग्य विमा पॉलिसीत बाळंतपणाच्या खर्चाचा समावेश केला जात नाही. पॉलिसी धोरणानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खर्च पॉलिसीधारकाला खर्च मिळतो. त्याचबरोबर गर्भवती असताना केलेल्या चाचण्यांचा खर्च देखील या पॉलिसीअंतर्गत दिला जातो. 

नवजात बालकाचाही समावेश

सर्वसाधारण आरोग्य विम्यात नवजात बालकाचा समावेश केला जात नाही. मात्र काही कंपन्या आपल्या पॉलिसीत 90 दिवसांनंतर नवजात बालकाला विमा कवच प्रदान करतात. त्याचबरोबर प्रतीक्षा कालावधीवरूनही कंपन्या वेगवेगळ्या ऑफर विमाधारकाला देतात. 

कमी प्रतीक्षा फायद्याची

बहुतांश विमा कंपन्या या आरोग्य विमा पॉलिसीत बाळंतपणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रतीक्षा कालावधी हा नऊ महिने ते 48 महिन्यांपर्यंत ठेवतात. सिक्योर नाऊ डॉटकॉमचे प्रबंध संचालक अभिषेक बोंदिया यांच्या मते, ज्या पॉलिसीत प्रतीक्षा कालावधी कमी असतो आणि त्यात नवजात बालकाचा समावेश केला जातो, त्या पॉलिसी फायदेशीर असतात. 

विमा हप्त्यावर परिणाम

प्रतीक्षा कालावधी कमी किंवा अधिक असल्याने विमा कंपन्यांच्या हप्त्यावरही परिणाम होतो. कमी प्रतीक्षेची पॉलिसी ही तुलनेने महागडी असते. तर अधिक प्रतीक्षेची पॉलिसी ही स्वस्त असते. पॉलिसीची निवड आपल्या गरजेनुसार करावी. बाळंतपणाचा लाभ देणारी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना एखाद्या फायद्याकडे आकर्षित होण्याचा मोह टाळावा.