Wed, Oct 24, 2018 01:32होमपेज › Arthabhan › सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन

सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन

Published On: Dec 04 2017 1:50AM | Last Updated: Dec 03 2017 9:04PM

बुकमार्क करा

आजही अनेक कुटुंबे आर्थिक नियोजनापासून फारच दूर आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखांना पैशासाठी अहोरात्र काम करायचे अन् कुटुंबाच्या गरजा व इच्छा पुरवायच्या इतकेच माहीत आहे. कारण आलेल्या पैशाचे व्यवस्थापन करण्याबाबतचे शिक्षण कोणत्याही शालेय अभ्यासक्रमात मिळाले नाही. बहुसंख्य लोकांनी आपले आर्थिक नियोजन म्हणून जवळचा विमा प्रतिनिधी, बँकेतील व्यवहाराशी निगडित अधिकारी, घरातील वरिष्ठ मंडळी, मित्रमंडळी जी कोणाच्यातरी सांगण्यावरून शेअर बाजारमध्ये थोडीफार गुंतवणूक केलेली असते किंवा कंपनीचा एजंट यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करतात आणि  तेथेच फसतात. कारण सहा आंधळे आपल्या स्पर्शातून जसे हत्तीचे वर्णन करतात तसे अनेकांचे नियोजनाबाबतीत होते.

आर्थिक नियोजनात नेमकेपणा आढळत नाही. जर एखाद्या व्यक्‍तीने करिअरला सुरुवात झाल्याबरोबर आपल्या भविष्याचा वेध घेऊन आर्थिक नियोजन केले तर त्याचे जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे. आर्थिक नियोजनाच्या जागरुकतेअभावी करिअरच्या सुरुवातीस बचत अन् गुंतवणूक करण्याऐवजी खर्चाकडे कल वळत जातो अन् आयुष्याचे गणित चुकल्याचे नंतर कळते. 

सर्वांनीच आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात आर्थिक नियोजनाविषयी अभ्यासक्रम 2008 पासून सुरू झाले आहेत. भारतात Financial Planning Standard Board of India हे बोर्ड 2008 साली स्थापन झाले असून या बोर्डातून बाहेर पडलेले Certified Financial Planner (CFP)   आर्थिक नियोजनकार यांची संख्या आजही फार कमी आहे; म्हणून या नियोजनाबाबत नेमकी माहिती सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचत नसल्याने ‘अर्थभान’च्या माध्यमातून आर्थिक नियोजनाबाबत माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न !

कॅश फ्लो पहा : आपल्या  कुटुंबामध्ये दरमहा येणारा पैसा अन् निरनिराळ्या गोष्टींवर होणारा खर्च यांचे बजेट तयार करा. किमान 30% रक्‍कम शिल्‍लक ठेवून योग्य गुंतवणूक करत असाल तर भविष्यासाठी अतिउत्तम जर 15% रक्‍कम शिल्‍लक राहत असेल तर भविष्यात तडजोड करावी लागेल. काहीच शिल्‍लक राहत नसेल तर ऋण रोग दारिद्य्राकडे वाटचाल आहे असे समजावे.

आपत्ती व्यवस्थापन :  जर आपल्या कुटुंबप्रमुखाचा नोकरी बदल व्यवसायातील मंदी, एखादा अपघात, मोठे आजारपण वगैरे प्रसंग आल्यास किमान सहा ते नऊ महिने आपला दरमहाचा खर्च भागवता आला पाहिजे इतकी रक्‍कम आपत्ती व्यवस्थापन म्हणून सदैव शिल्‍लक असावी. मात्र ही रक्‍कम म्युच्युअल फंडाच्या लिक्‍विड योजनेत ठेवावी.

जोखीम व्यवस्थापन करा :  कुटुंबप्रमुखाचे दरमहा येणारे उत्पन्‍न अनपेक्षित घटनामुळे थांबते. उदा. मृत्यू, अपघात, आजारपण, यासाठी योग्य विम्याचे नियोजन करा. त्यासाठी कुटुंबप्रमुखाचा आयुर्विमातील टर्म प्लान निव्वळ जोखीम घेणारा विमा घ्यावा व वार्षिक उत्पन्‍नाच्या किमान 15 पट विमा असावा. उदा. अ  या 35 वर्षे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्‍न दरमहा वीसहजार असेल तर किमान तीस ते पस्तीस लाखांचा निव्वळ जोखीम (टर्म) प्लान आयुर्विमा हवाच. बर्‍याच वेळेस विमा व गुंतवणूक असे पारंपरिक विमे घेतले जातात. तसे न करता निव्वळ जोखमीचा विमा घ्यावा. वैद्यकीय विमा व व्यक्‍तिगत अपघाती विमा हा कुटुंबातील सर्वांचा घ्यावा. सर्व जोखीम व्यवस्थापनेसाठी एकूण उत्पन्‍नापैकी 6 ते 8 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नये.

भविष्यातील  ध्येयधोरणांचा वेध घ्या : कुटुंंबातील सदस्यांनी एकत्र बसून भविष्यातील गरजा व आर्थिक उद्दिष्टे ठरविली पाहिजेत. गाडी घेणे, घर बांधणे, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्‍न परदेशवारी वगैरे गरजांचा कोणत्या वर्षी वाढत्या महागाईनुसार किती रक्‍कम लागणार? याचा वेध घ्यावा, अल्पमुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदत असा कालमानानुसार व अग्रक्रमानुसार आराखडा तयार करावा. शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात करा. गुंतवणूक करताना आज बँकाचे  दर खाली आहेत व भविष्यातही कमी होतील म्हणून भांडवली बाजारातील म्युच्युअल फंडमध्ये एस.आय.पी.च्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक पद्धतीने सुरू करा.

रिटायर्डमेंट प्लॅनिंग : रिटायर्डमेंट हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन प्रक्रिया आहे. 

दीर्घकाळामध्ये पैसा जमविणे व दीर्घकाळासाठी खर्च करणे हे दोन महत्त्वाचे भाग आहेत. कित्येक कुटुंबप्रमुख फक्‍त कुटुंबाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. मात्र स्वत:च्या रिटायर्डकडे दुर्लक्ष करतात. नेमके रिटायर्डमेंटनंतर आर्थिक विवंचनेत अडकतात व नशिबाला दोष देत बसतात. पूर्वी आपली मुले ही आपल्या रिटायरमेंटचे आधार मानले जात, पण आजची मुले उच्चशिक्षित असून करिअरसाठी नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत असतात. मुलांना आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अन् पैसाही नाही अशी अवस्था आज सर्वत्र दिसते म्हणून रिटायर्डमेंटसाठी जितक्या लवकर सुरुवात कराल तितके अधिक चांगले ठरते. 

रिटायर्डमेंटसाठी अगदी काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे असते. कोणत्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतो व त्याचा वृद्धीचा दर हीच खरी कसोटी ठरते. उदा. पहायचे झाल्यास 35 वयाच्या व्यक्‍तीचा खर्च 15000/- असेल तर हा खर्च 7 टक्के महागाई ने वयाच्या 60 व्या वर्षी हा खर्च 81400/- इतका असेल. साठनंतर ऐंशीपर्यंत जगण्यासाठी 60 व्या वर्षी त्याच्याकडे किमान 195 लाख हवेत. हा आराखडा फक्‍त फायनान्सिअल प्लॅनरच तुम्हास देऊ शकतो. मग वरील रक्‍कम किती परताव्याने निर्माण करणार हे फार महत्त्वाचे आहे. उदा. 6 टक्के, 8 टक्के, 12 टक्के की 15 टक्के दराने किती जोखीम घेऊन किती परतावा मिळणार याबाबत सविस्तर माहिती घेऊन रिटायर्डमेंटरचे नियोजन करावे.

इस्टेट प्लॅनिंग : आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आयुष्यभर मिळविलेले जी संपत्ती असेल ती आपल्या आवडत्या लोकांमध्ये योग्य पद्धतीने वाटप करणे ही बाब फार महत्त्वाची असते कारण आजही आपल्या कोर्टात जवळपास 80 टक्के  ते दावे कुटुंबप्रमुखाच्या पश्‍चात संपत्तीच्या वाटप वादातून दाखल झालेली दिसतात म्हणून इच्छापत्राद्वारे आपल्या संपत्तीचे वाटप योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. वरीलप्रमाणे प्रत्येकाने आपले आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. जे नियोजन करण्यात अपयशी ठरतात ते अपयशी ठरण्यात नियोजन करतात. आज पैसा मिळविण्यापेक्षा मिळविलेला पैसा टिकविण्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.

अनिल पाटील
(प्रवर्तक एस पी वेल्थ मॅनेजमेंट, कोल्हापूर)