Wed, Feb 26, 2020 17:41होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Last Updated: Feb 10 2020 1:33AM
प्रीतम मांडके

गतसप्ताहात निफ्ती व सेन्सेक्स निर्देशांक अनुक्रमे 436.50 आणि 1406.32 अंकात वाढ दर्शवून 12098.35 व 41141.85 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात अनुक्रमे 3.74 टक्के आणि 3.54 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

गतसप्ताहात झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैमासिक पतधोरण आढावा बैठकीत देशातील व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. पुढील दोन महिन्यांसाठी रेपोरेट दर 5.15 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. 2020-2021 सालात अर्थव्यवस्थेचा जीडीपी 6 टक्क्यांवर कायम राहणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीच्या पुनर्खरेदी (म्हणजेच एलटीआर) तत्त्वानुसार सुमारे 1 लाख कोटींचा निधी खुला करण्याची घोषणा देखील रिझर्व्ह बँकेने केली.

यापुढे ‘बहुराज्यस्तरीय सहकारी बँकांवर (मल्टीस्टेट को-ओपरेटिव्ह बँक)’ थेट रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे नियंत्रण असणार ‘बँकिंग रेम्युलेशन अ‍ॅक्ट’अंतर्गत सहकारी बँकांना अधिक कठोर नियमांचे पालन करायला लावणारे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाकडून पारित केले गेले. ‘पीएमसी’ बँक घोटाळ्यानंतर केंद्र सरकारचे कडक पाऊल. 

दुबईचे दिवाळखोरी संबंधी कायदे काही प्रमाणात भारतातील कंपन्यांवर लागू करण्यास केंद्रसरकारची मान्यता. या निर्णयानंतर दुबईच्या 9 बँकांनी भारतीय कर्जबुडवणार्‍या कंपन्यांविरोधात 50 हजार कोटींची वसुली करण्यासाठी कायदेशीर कारवाईची सुरुवात केली.

इंडस्ट्रीयल कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना  डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट इपोर्ट बँक ऑफ चायना या तीन चीनच्या बँकांनी अनिल अंबानींच्या ‘आरकॉम’ विरोधात लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला. एकूण आरकॉमने 70 दशलक्ष डॉलर्स थकवल्याचा आरोप. लंडनच्या कोर्टाने अनिल अंबानींना पुढील सहा आठवड्यात 100 दशलक्ष डॉलर्स जमा करण्याचे आदेश दिले.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत देशातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलने 1229 कोटींचा तोटा जाहीर केला. युरोपमधील टाटा स्टीलच्या उपकंपन्यांनीदेखील 956 कोटींचा तोटा जाहीर केला. भारतीयस्तरावर टाटा स्टीलच्या नफ्यात 47 टक्क्यांनी घट होऊन नफा 2253 कोटींवरून 1194 कोटींवर खाली आला. 

जगातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी ‘आर्सेलर मित्तल’ कंपनीला साल 2019 मध्ये तब्बल 2.4 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. जगात असणार्‍या आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पोलाद उत्पादक करणार्‍या कंपन्यांना तोटा होत असल्याने कंपनीचे प्रतिपादन.

येस बँकेला 10 हजार कोटींचा निधी उभा करण्यास समभागधारकांची मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे 1100 कोटींचा निधी हा समभागांच्या माध्यमातून उभा केला जाणार. 
नुव्होको व्हिस्टाज कंपनी निरमा उद्योगसमूहाची सिमेंट क्षेत्रातील ‘इमामी सिंमेट’5500 कोटींना विकत घेणार. या व्यवहारमध्ये पश्‍चात  इमामी कंपनी संपूर्णपणे कर्जमुक्‍त होणार.

अर्थवर्ष 2020-2021 मध्ये देशातील सुमारे 50 रेल्वे स्टेशन्स अद्ययावत केली जाणार. यासाठी केंद्र सरकारकडून 50 हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार. त्यापैकी मुंबईचे महत्त्वाचे ‘सीएसटी’ स्थानकासाठी 1500 कोटी खर्चले जाणार.

डी-मार्टची मालकी असणार्‍या ‘एव्हेन्यू सुपरमार्ट’चा 4 हजार कोटींचा वस्तू बाजारात आणाला जाणार. यासाठी 1999.04 रुपये प्रतिसमभाग क्यूआयपी किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट सुमारे स्वतःजवळील 20 दशलक्ष समभागांची विक्री करून .18 टक्के हिस्सा बाजारात विकणार. 

इलेक्टॉनिक वस्तू या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र सरकार 45 हजार कोटींचा निधी विविध मार्गांनी खर्च करणार. त्यापैकी 4 हजार कोटी भांडवल स्वरूपात, तर 41 हजार कोटींच्या सवलती उत्पादक कंपन्यांसाठी दिल्या जाणार. 

31 जानेेवारी रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजली तब्बल 4.607 अब्ज डॉलर्सनी वधारून आजपर्यंतच्या विक्रमी म्हणजेच 471.3 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली.