Sun, Dec 08, 2019 06:28होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Published On: Aug 05 2019 1:30AM | Last Updated: Aug 05 2019 1:30AM
प्रीतम मांडके

 गतसाप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने दर्शवून 10997.35 व 37118.22 अंकाच्या पातळीवर बंद भाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे 20.45 टक्के, तसेच 2.02 टक्क्यांची घट झाली. निर्देशांकांमध्ये झालेल्या घसरणीमुळे बॉम्बे (मुंबई) स्टॉक एक्स्चेंजचे (बी.एसई.) बाजार भांडवलमूल्य एकूण 3.83 लाख कोटींनी कमी झाले, तसेच 5 जुलै रोजी या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बीएसईचे बाजार भांडवलमूल्य आतापर्यंत सुमारे 11.37 लाख कोटींनी घटले. अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंत व्यक्ती/संस्था याच्यावर लादलेल्या अधिभारामुळे 5 कोटी किंवा त्यापेक्षा अधिकची कमाई असणार्‍यांना उत्पन्नाच्या एकूण 42.74 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागणार असल्याची तरतूद करण्यात आली. या नियमाअन्वये परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात विक्री करण्याचा सपाटा लावला. यामुळे जुलै महिन्यामध्ये फॉरेन पोर्ट फोलिओ इन्व्हेस्टर (परदेशी गुंतवणूकदार) यांनी एकूण 3758 कोटींची विक्री केली. आता या प्रकरणामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घातल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा चालू आर्थिक वर्षाचा पहिल्या तिमाहीचा नफा 2312 कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत एसबीआयला 4875कोटींचा तोटा झाला होता. एकूण अनुत्पादित कर्जे 2.13 लाख कोटींवरून 21 टक्के घटून 1.68 लाख कोटींवर खाली आली एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 7.53 टक्क्यांवर पोहोचले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इनकम) 21798.4 कोटींवरून 5.23 टक्के वधारून 22938.79 कोटींवर पोहोचले.

 अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील व्यापारयुद्ध आणखी तीव्र. 1 सप्टेंबर पासून चीनमधून अमेरिकेमध्ये आयात होणार्‍या सुमारे 300 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर 10 टक्के कर लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांचा निर्णय. चीनने देखील अमेरिकेतून येणार्‍या 110 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर आयात कर लादण्याचा निर्णय घेतला होता.

 देशातील एफएमसीजी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘आयटीसी’चा नफा 12.6 टक्के वधारून 2818 कोटीवरून 3173.9 कोटींवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्री 10874 कोटींवरून 11502.8 कोटींवर पोहोचली. 

 दूरसंचारसंबंधी यंत्रे तसेच तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी रिलायन्स परदेशातून 1 अब्ज डॉलर्सचे (सुमारेेे 7 हजार कोटी) आणि विमा व्यवसायाशी संबंधित क्षेत्रामध्येही शिरकाव करण्याचा कंपनीचा मानस.
 चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अ‍ॅक्सिस बँकेचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 701 कोटींवरून दुपटीने वाढून 1370 कोटींवर पोहोचला. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे  प्रमाण 3.09 टक्क्यांवरून 2.04 टक्क्यांवर पोहोचले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 5167 कोटींवरून 13 टक्के वधारून 5844 कोटींवर पोहोचले.

 स्टेट बँक ऑफ इंडियाची मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात 1 ऑगस्टपासून दोन कोटींपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर व्याजदरात 0.20 टक्क्यांची तसेच, 2 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींवर 0.35 टक्क्यांची कपात करण्यात आली. त्याचाप्रमाणे 179 दिवसांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात 0.50 टक्के ते 0.75 टक्क्यांची कपात करण्यात आली.

 भारतीय अर्थव्यवस्था वर्षभरात 2.65 लाख कोटी डॉलर वरून 2.72 लाख कोटी डॉलर झाली. परंतु, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची पाचव्या स्थानावरून सातव्या घसरण. 20.49 लाख कोटी डॉलरसह अमेरिकेने जागतिक अर्थव्यवस्थेत प्रथम क्रमांक पटकावला, तर 13.60 लाख कोटी डॉलरसह चीन दुसर्‍या स्थानावर.

 अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल बँकेने देशातील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केले. 2008 नंतरच्या मंदीनंतर प्रथमच अमेरिकेतील व्याजदर घटवण्यात आले.

 झी उद्योगसमूहाचे प्रवर्तक ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राईज’ मधील 11 टक्के हिस्सा 4224 कोटींना अमेरिकेच्या इन्व्हेस्को ओपनहेमर कंपनीला विकणार झी. उद्योग समूह 30 सप्टेंबर पर्यंत पायाभूत क्षेत्रातील तसेच ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनी विकून 20  हजार कोटींचा निधी कर्ज फेडण्यासाठी उभा करणार.

 फ्युचर लाईफ स्टाईल कंपनीतील 6 टक्के हिस्सा 545 कोटींना अमेरिकेचा खासगी गुंतवणूक उद्योगसमूह ‘ब्लॅक्स्टोन’ ने विकत घेतला. या व्यवहारात सुमारे 11 दशलक्ष समभागांचे 466.25 रुपये प्रतिसमभाग दराने हस्तांतरण झाले.