Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Arthabhan › वाढता वाढता वाढेल...

वाढता वाढता वाढेल...

Published On: Nov 13 2017 2:01AM | Last Updated: Nov 12 2017 10:56PM

बुकमार्क करा

डॉ. वसंत पटवर्धन

पोलाद क्षेत्रातील सध्याचे वातावरण बघता टाटा स्टीलही गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. गेल्या वर्षातील किमान 367 रुपयांपर्यंत असलेल्या भावापासून तो आता 704 रुपयांपर्यंत चढला आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर 19.4  पट दिसते. वर्षभरात  शेअरचा भाव 1000 रुपयांपर्यंत जावा.

गेल्या आठवड्यात नोटाबंदीला एक वर्ष झाले आणि त्यामुळे फायदे-तोटे कुठले झाले यावर सरकारी बाजू आणि विरोधकांची बाजू यात भरपूर कलगीतुरा रंगला. पण गोळाबेरीज केली तर त्यामुळे फायदेच जास्त झाल्याचे दिसते. 

बँकांमध्ये 1305 लक्ष कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आणि ही रक्‍कम कर्जे किंवा कर्जरोखे यात गुंतली की अर्थव्यवस्था वाढीला लागेल. कर्जातून प्रकल्पाना साह्य मिळेल. तर महामार्गासाठी संकल्पित सात लक्ष कोटी रुपयांचे कर्जरोेखे अपेक्षित आहेत, त्यासाठी भरणा झाला. प्रशस्त महामार्ग बनतील. प्राप्तिकर विवरण पत्रांद्वारे नवीन सव्वा कोटी लोक करप्रणालीत आले. 

बँकांकडे भरपूर पैसे आल्याने ते गुंतवण्यासाठी बँकांनी स्वस्त व्याज दराने गृहकर्जे व वाहन कर्जे दिली. परिणामी अनेकांना घराचे स्वप्न साकार करता आले. वापरातील चलन 17.77 लक्ष कोटी रुपयांवरून 14.75 लक्ष कोटी रुपयांवर आली. डिजिटल व्यवहार वाढले. अनेक ‘शेल,’ कंपन्या उघडकीस आल्या व त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. अनेक नगरपालिकांची मालमत्ता कराची वसुली झाली. आयुर्विमा कंपनीचे विमाहप्ते वाढले. शेअरबाजारात बरीच रक्‍कम आली. प्राथमिक भागविक्रीमुळे अनेक कंपन्यांना भागभांडवल उभारता आले तर दुय्यम बाजारात निर्देशांक 33000 पर्यंत वर गेला आणि निफ्टी 10300 वर गेला. म्युच्युअल फंडात 90000 कोटी रुपये आले. डिजिटल व्यवहार ऑगस्ट 2016 मध्ये 87 कोटी होते ते 136 कोटीवर गेले. 

गेल्या आठवड्यात भारताबाहेर पैसे नेलेल्या 714 जणांची यादी पॅरॅडाईज पेपर्समध्ये जाहीर झाली व त्यावर प्राप्तिकर खाते व एन्फोर्सनेट खाते लक्ष ठेवून आहे. गेल्या आठवड्यात ज्या कंपन्यांनी सप्टेंबर 2017 तिमाहीचे विक्री व नक्‍त नफ्याचे आकडे जाहीर केले. त्यातील काही कंपन्यांचे आकडे खाली दिले आहेत. गत सप्टेंबरचे कंसात आहेत. 

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट उत्पन्‍न 80.7 कोटी रुपये झाले. (71.28 कोटी रु.) कानटेक्स गार्मेंटस 24.12 कोटी रु. (13.06 केटी रुपये) शीला फोम 31.37 कोटी रु. (29.16 कोटी रुपये).

हिंदुस्थान पेट्रोलियमला या तिमाहीत 54335 कोटी रुपयांच्या विक्रीवर 1737.34 कोटी रुपये नक्‍त नफा झाला. सप्टेंबर 2016 ची तिमाहीची विक्री 47822 कोटी रुपये होती व नफा 701.32 कोटी रुपये होता. तिचे भागभांडवल 1523.82 कोटी रुपये आहे. ओएनजीसीची ती पोटकंपनी होणार आहे व केंद्र सरकार आपले शेअर्स ओ. एन.जी.सी.ला देणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या तीन वर्षात दोनदा बक्षीसभाग दिले आहेत. सध्या शेअरचा भाव 426 रुपये आहे. या भावाला किं /उ गुणोत्तर 7.80 पट दिसते. शेअरगणिक या तिमाहीचे उपार्जन 11.40 रुपये आहे. भागभांडारात हिंदुस्थान पेट्रोलियम व ओएनजीसी जरूर हवेत. 

आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत व माँटे कार्लो ही कंपनी यात लागणारे ब्रँड कपड्यांचे उत्पादन करते. कंपनीचे भागभांडवल 21.73 कोटी रुपये आहे. गंगाजळी 466.77 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2017तिमाहीचा तिचा करोत्तर नफा 15.56 कोटी रुपये आहे. गेल्या सप्टेंबरपेक्षा तो तिप्पट आहे. सप्टेंबर 2016 तिमाहीचा करोत्तर नफा 5.2 कोटी रुपये होता. गेल्या थंडीत निश्‍चलनीकरणामुळे कंपनी कुडकुडली होती. पण यंदा तिची विक्री खूप वाढेल. प्रवर्तकांकडे 64.25 टक्के शेअर्स आहेत. म्युच्युअल फंडस, विदेशी गुंतवणूक संस्था, भारतीय कंपन्या यांचेकडे 26 टक्के शेअर्स आहेत व जनतेकडे फक्‍त  9 टक्के शेअर्स आहेत. मार्च 2018 वर्षासाठी कंपनीची संभाव्य विक्री 650 कोटी रुपये व्हावी व शेअरगणिक उपार्जन 30 रुपये असेल. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताना, कॉर्पोरेट कर 35 टक्क्यांवरून 15 टक्के आणायचे अभिवचन दिले होते. पण आता त्यांना 25 टक्के कॉर्पोरेट कर ठेवणे भाग झाल्याने अमेरिकन शेअरबाजाराला एक सौम्य झटक बसला आहे. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ या न्यायाने त्यामुळे भारतातही शेअरबाजार लुडकला आहे. त्यामुळे सर्किटमधून सुटलेले ग्राफाइट इंडिया व हेग (कएॠ) शेअर्स वर्षभरासाठी घेणे फायदेशीर ठरेल. ग्राफाइट इंडिया 580 रुपयांपर्यंत व एचईजी (कएॠ) 1800 रुपयांना मिळत आहे.

सध्या सौदी अरेबियातील राजघराण्यात सुंदोपसुंदी चालू आहे. सुदैवाने त्याचा शेअरबाजारावर परिणाम होत नाही हे सुदैव आहे. पेट्रोलचे भाव आता वर जाऊ लागले आहेत व त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर व व्यापारातील चालू खात्याचा तुटीवर विपरित होईल. 

अ‍ॅप कोटेक कंपनीची या तीन महिन्यांची विक्री 129 कोटी रुपये झाली. गेल्या सप्टेंबर तिमाहीपेक्षा ती 40 टक्के जास्त आहे. नक्‍त नफा 6.48 कोटी रुपये होता. सध्या शेअरचा भाव 465 रुपयांच्या आसपास आहे. 2020 च्या उपार्जनाचा विचार करता, त्या संदर्भात किं/उ गुणोत्तर 13.7 पट दिसते. हा शेअर वर्षभरात 600 रुपयांपर्यंत जावा. कंपनीची मार्च 2016 व 2017 वर्षाची विक्री अनुक्रमे 268 कोटी रुपये व 390 कोटी रुपये होती. करोत्तर नफा 24.7 कोटी रुपये व 19.1 कोटी रुपये अनुक्रमे होती. मार्च 16 व मार्च 17 साठी शेअरगणिक उपार्जन 11.9 रुपये व 9.2 रुपये होते. 2018 व 2019 मार्चसाठी विक्री 505 कोटी रुपये व 580 कोटी रुपये व्हावी. संभाव्य शेअरगणिक उपार्जन 18 रुपये व 25 रुपये व्हावे. 2020 साठी ते 35 रुपये होऊ शकेल. सध्याच्या गुंतवणुकीवर वर्षभरात 20 टक्के नफा मिळू शकेल. गेल्या वर्षभरातील शेअरचा किमान भाव 284 रुपये होता. माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही. 

पण पोलाद क्षेत्रातील सध्याचे वातावरण बघता, टाटा स्टीलही गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. गेल्या वर्षातील किमान 367 रुपयांपर्यंत असलेल्या भावापासून तो आता 704 रुपयांपर्यंत चढला आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर 19.4  पट दिसते. वर्षभरात  शेअरचा भाव 1000 रुपयांपर्यंत जावा. पोलाद क्षेत्रातील जिंदाल स्टीलही 165 रुपयांच्या आसपास आहे. तोही वर्षभरात 35 टक्के वाढू शकेल.