Sun, Apr 21, 2019 06:11होमपेज › Arthabhan › शेअरबाजाराचा आश्‍वासक ‘मूड’

शेअरबाजाराचा आश्‍वासक ‘मूड’

Published On: Nov 05 2018 1:28AM | Last Updated: Nov 04 2018 10:29PMडॉ. वसंत पटवर्धन

शेअरबाजार सध्या आश्‍वासक ‘मूड’मध्ये आहे. बहुतेक कंपन्यांचे सप्टेंबर 2018 तिमाहीचे विक्री व नक्‍त नफ्याचे आकडे उत्तम येत आहेत. अर्थव्यवस्थाही बळकट होत चालल्याचे वस्तुसेवा कराच्या व वाहन विक्रीच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. 

जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांचा करमहसूल अनुक्रमे 96383 कोटी रुपये, 93960 कोटी रुपये, 94442 कोटी रुपये व 100710 कोटी रुपये असा आहे. करपत्रक भरणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये 67.45 लक्ष जणांनी करपत्रक भरले.

बजाज इलेक्ट्रिकल्सची या तिमाहीची विक्री 1598.44 कोटी रुपये झाली. करोत्तर नफा 34.08 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 3.97 रुपये पडले. सप्टेंबर 2017 च्या तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे 935.58 कोटी रुपये, 30.65 कोटी रुपये व 1.87 रुपये होते. सध्या शेअरचा भाव 500 रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर 60 पट इतके  महाग आहे. 

कॅनरा बँकेचे एकूण उत्पन्न या तिमाहीसाठी 12679.96 कोटी रुपये आहे. बँकेचा तोटा यावेळी 507.76 काटेी रुपये आहे. त्यामुळे इथे गुंतवणुकीचा प्रश्‍नच येत नाही.सिंडीकेट बँकेचे एकूण उत्पन्न 5888.97 कोटी रुपये आहे. पण याही बँकेला या तिमाहीमध्ये 1647.19 कोटी रुपयांचा तोटा आहे. त्यामुळे इथेही गुंतवणूक करू नये.

हिंदुस्थान पेट्रोलियमची त्रैमासिक विक्री 73376.09 कोटी रुपये होती. करोत्तर नफा 1091.98 कोटी रुपये आहे. शेअरगणिक उत्पन्न 7.17 रुपये आहे. सप्टेंबर 2017 या तिमाहीसाठी हे आकडे 54343 कोटी रुपये, 1734.74 कोटी रुपये व 11088 रुपये होते. त्यामुळे नेहमी आकर्षक वाटणार्‍या या शेअरकडेही दुर्लक्ष हवे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन (कऊऋउ)ची त्रैमासिक विक्री, तिच्या एचडीएफसी मॅनेजमेंट या पोट कंपनीची शेअरबाजारावर नोंदणी झाल्यामुळे वाढलेली आहे. नक्‍त नफ्यात यावेळी 25% वाढ आहे. दिलेल्या कर्जाची रक्‍कम 17 टक्क्यांनी वाढली आहे. शेअरचा भाव सध्या 1830 रुपये आहे. वर्षभरात त्यात 15 टक्के वाढ व्हावी. 

गेल्या वेळेस आवर्जून गुंतवणूक करण्यासाठी सुचवलेल्या येस बँकेचा शेअर मॉर्गन स्टॅन्लेने ही भलावण केली आहे. आता तो 209 रुपये आहे. जानेवारी 2019 मध्ये हा शेअर 240 ते 250 रुपये व्हावा. श्री. राणा कपूर यांच्या जागी येणार्‍या उत्तराधिकार्‍याची नियुक्‍ती तोपर्यंत जाहीर झाली असेल. पिरामल एंटरप्रायझेसही गेल्या आठवड्यात 10 टक्क्यांनी वर गेला. शुक्रवारी शेअरचा भाव 2152 रुपये आहे. वर्षभरात तो 3000 रुपयांची सीमा ओलांडेल.बजाज फायनान्सही आठवडाभरात वाढत राहील. शुक्रवारी तो 2474 रुपयांपर्यंत वाढला आहे. वर्षभरात तो 3000 रुपयांची पातळी ओलांडेल. हा शेअर कधीही विकू नये.

हनीवेल ऑटोमिशन इंडियाची विक्री 803.60 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 189.10 कोटी रुपये होता. शेअरचे उपार्जन 110.15 रुपये आहे. शेअरचा भाव 20340 रुपये आहे. मोठ्या भावामुळे व्यवहार फार मर्यादित म्हणजे फक्‍त 1500 ते 2000 शेअर्सचेच होतात. किं/ऊ. गुणोत्तर 63 पट आहे.सप्टेंबर 2018 तिमाहीसाठी झुआरी ग्लोबलची विक्री 198.7 कोटी रुपये होती. नक्‍त नफा अन्य  उत्पन्न धरून 302 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 10.27 रुपये होते. 

इंडोस्टार कॅपिटल फायनान्सची या तिमाहीची विक्री 319.76 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 63.98 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 7.15 रुपये पडते. सप्टेंबर 2017 तिमाहीसाठीचे हे आकडे अनुक्रमे 199.49 कोटी रुपये 69.45 कोटी रुपये व 8.84 रुपये होते. जून 2018 च्या तिमाहीपेक्षा नक्‍त नफा 103 टक्क्याने जास्त आहे. अनार्जित कर्जे (ढोबळ व नक्‍त) 1 टक्क्यापेक्षा कमी आहेत. कंपनीने पहिल्यांदाच अंतरिम लाभांश 10 टक्के दिला आहे. तिच्या अवस्थापनाखालील जिंदगी 7767 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2017 पेक्षा त्यात 76 टक्के वाढ आहे. कंपनीची 17 राज्यात 155 ठिकाणी कचेर्‍या आहेत. तिचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईला आहे. 

सेरा सॅनिटरी वेअर कंपनीची या तिमाहीची विक्री 330.98 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 43.43 कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअरगणिक उपार्जन 21.64 रुपये आहे. सप्टेंबर 2017 तिमाहीपेक्षा ते 3 टक्केवर आहे. सोमाणी समूहातील ही कंपनी आहे. 

कोचीन शिपयार्डची या तिमाहीची विक्री 658.73 कोटी रुपयांवरून 799.40 कोटी रुपये झाला आहे. नक्‍त नफा 146.81 कोटी रुपयांवरून 232.29 कोटी रुपये झाला आहे. शेअरगणिक उपार्जन 10.86 रुपये आहे. सप्टेंबर 2017 साठी हे आकडे अनुक्रमे 583.23 कोटी रुपये 100.20 कोटी रुपये व 7.93 रुपये होते. कंपनीने यावर्षीच आपली प्राथमिक भाग विक्री 962 कोटी रुपयांची केली होती. 

व्ही. एस. टी. इंडस्ट्रीज (पूर्वीची वझीर सुलतान टोबॅको कंपनी) या तिमाहीची विक्री 320.35 कोटी रुपये आहे. नक्‍त नफा 57.18 कोटी रुपये आहे. कंपनीचे भागभांडवल फक्‍त 15.44 कोटी रुपये असल्याने शेअरगणिक उपार्जन 37 रुपये दिसते. सप्टेंबर 2017 तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन 28.50 रुपये होते. 

सेंचरी एन्काची या तिमाहीची विक्री 483.20 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 23.23 कोटी रुपये होता. कंपनीचे शेअरगणिक उपार्जन 10.63 रुपये होते. सप्टेंबर 2017 तिमाहीसाठी विक्री 310.42 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 18.14 कोटी रुपये होता आणि शेअरगणिक उपार्जन 8.30 रुपये होते. गुंतवणुकीसाठी बजाज फयनान्स, पिरामल एंटरप्रायजेस व एस बँक निवडावेत.