Wed, Oct 24, 2018 02:29होमपेज › Arthabhan › रूपे कार्डचं महत्त्व

रूपे कार्डचं महत्त्व

Published On: Dec 04 2017 1:50AM | Last Updated: Dec 03 2017 8:56PM

बुकमार्क करा

हल्ली कॅशलेस व्यवहारांना बरंच प्रोत्साहन दिलं जात आहे. अशा व्यवहारांना चालना देण्याच्या द‍ृष्टीने सरकारकडून विशेष योजना राबवल्या जात आहेत. त्यात अलिकडे रूपे कार्डबद्दल चर्चा होताना आढळते. सद्य:स्थितीत रोख व्यवहार कमी करून अधिकाधिक व्यवहार प्लास्टिक मनी किंवा ऑनलाईन माध्यमातून घडवून आणण्यावर सरकारचा भर आहे. आपल्याकडे डेबिड आणि क्रेडिट कार्ड असतं. ही मास्टर किंवा व्हिसा कार्डं असतात. त्यामुळे रूपे कार्ड म्हणजे नेमकं काय? मास्टर आणि व्हिसाच्या तुलनेत ते वेगळं आहे का? हे कार्ड घेणं उपयुक्‍त ठरेल का? हे जाणून घ्यायला हवं. 
काय आहे ‘रूपे’?

‘रूपे’ हेसुद्धा असंच एक पेमेंट नेटवर्क आहे. पण हे जाळं पूर्णपणे भारतीय आहे. रूपे ही भारतीय कंपनी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रूपेची निर्मिती केली आहे. आजघडीला रूपेने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक अशा एकूण 600 बँकांसोबत करार केला आहे. भारतात रूपे कार्डचा वापर वाढताना दिसत आहे. नोटबंदीनंतर क्रेडिट तसंच डेबिट कार्डच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. त्यात रूपे कार्डही आघाडीवर आहे. 

रूपेचे लाभ : 
रूपे हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं पेमेंट नेटवर्क आहे. व्हिसा आणि मास्टर कार्डने होणार्‍या व्यवहारांच्या तुलनेत रूपे कार्डने होणार्‍या व्यवहारांवर कमी शुल्क भरावं लागतं. रूपेचा भाग बनण्यासाठी बँकांना कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. व्यवहाराची माहिती भारतातच राहते. 

कच्चे दुवे :
सर्व ठिकाणी रूपेचा स्वीकार झालेला नाही. याचा वापर मर्यादित आहे. 

कसा करायचा अर्ज?
तुमची बँक रूपे कार्ड उपलब्ध करून देते का हे जाणून घ्या. जनधन योजनेचा लाभ देणार्‍या सर्व बँकांचं डेबिट कार्ड रूपे हेेचं असतं. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज भासत नाही. 

काय आहे मास्टर आणि व्हिसा?

मास्टर आणि व्हिसा हे क्रेडिट कार्डचं जाळं आहे. आर्थिक व्यवहारांसंबंधी त्यांची अशी स्वत:ची प्रक्रिया, नियम आणि पद्धत आहे. मास्टर आणि व्हिसा या दोन्ही अमेरिकन कंपन्या आहेत. या कंपन्यांचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. जगभरात ते स्वीकारण्यात आलं आहे. व्हिसा किंवा मास्टर या कंपन्यांची स्वत:ची कार्ड नाहीत तर विविध बँका डेबिट तसंच क्रेडिट कार्डद्वारे होणार्‍या आर्थिक व्यवहारांसाठी या कंपन्यांची निवड करतात. एका अर्थाने या कंपन्या  पेमेंट नेटवर्क ऑपरेटर आहेत.