Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Arthabhan › हुरळण्याचे किंवा हळहळण्याचे कारण नाही!

हुरळण्याचे किंवा हळहळण्याचे कारण नाही!

Published On: Oct 08 2018 12:54AM | Last Updated: Oct 08 2018 12:54AMडॉ. वसंत पटवर्धन

शेअर बाजारात  सध्या खुलेआम कत्तल चालली आहे. तशी कारणे काहीही नाहीत. पेट्रोल व डिझेलचे भाव केंद्राने अनुक्रमे अडीच व चार रुपयांनी कमी केले आहेत. महाराष्ट्र व अन्य अनेक राज्यांनी कर कमी करून लिटरमागे भाव अजून अडीच रुपयांनी कमी केले आहेत. भाववाढीबद्दल सतत ओरड करणार्‍या काँग्रेस व कम्युनिस्टांचे राज्य असलेल्या कर्नाटक व केरळ राज्यांनीच दर कमी केले नाहीत.

या खेरीज शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक धोरण जाहीर करताना रेपोदरात काहीही बदल केला नाही. यापूर्वीच तरलता वाढवण्यासाठी वैधानिक परिणाम कमी करून तिने बाजारात दोन लक्ष कोटी रुपयांची द्रवता वाढवली आहे. अन्य बातम्यात रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 7.2 टक्के राहील, असा दिलासा दिला आहे. तर संयुक्‍त राष्ट्र  पर्यावरण कार्यक्रम विभागाने, पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्‍त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हे या पुरस्काराचे नाव आहे. 

पण आर्थिक क्षेत्राने याबाबत डोळेझाक केली आहेच. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारताच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर शुक्रवार-शनिवार रोजी होते. त्यांच्या भेटीत अनेक सामंजस्य करार करण्यात आले, ते विशेषतः संरक्षणसंबंधित होते. 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी निर्देशांक 34376 वर आणि निफ्टी 10316 वर बंद झाला. सरकारने पेट्रोल तेल शुद्धीकरण कंपन्यांना पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करायला लावले व त्यांना द्यायचे अनुदानही घटवले. त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम 165 रुपयांवर; भारत पेट्रोलियम 265 रुपयांवर व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 118 रुपयांवर बंद झाले. गेल्या आठवड्यातील घसरण 28 टक्के होती. ओएनजीसी ही 147 रुपयांपर्यंत तुटला. बजाज फायनान्स 2023 वर शुक्रवारी बंद झाला. 

येस बँक 165 रुपयांपर्यंत विक्रमी घसरला होता पण नंतर तो 206 रुपयाला बंद झाला आहे. येस बँक 200 रुपयांच्या मागेपुढे घेण्यासारखा शेअर आहे. ती एक उत्कृष्ट बँक आहे व राणा कपूर यांनी तिच्या वाढीसाठी जिवापाड प्रयत्न केले आहेत. सध्या त्यांना फक्‍त जानेवारी 2019 अखेरच मुदतवाढ मिळाली असली तरी त्यांचा उत्तराधिकारी ही एखादा नामवंत बँकरच असेल. त्यामुळे या बँकेत सध्या गुंतवणूक केली तर सातआठ महिन्यात त्यात किमान 35 टक्के व कमाल 55 टक्के वाढही मिळू शकेल. 

हिंदुस्थान  पेट्रोलियम व भारत  पेट्रोलियमही सध्या आकर्षित करणार्‍या भावात खरेदी होऊ शकतात. या कंपन्या लाभांशही उत्तम देत असल्याने गुंतवणुकीवरील परतावा (ूळशश्रव) उत्तम असतो. हे शेअर्स भागभांडारात कायम हवेत. पेट्रोल व पेट्रोल शुद्धीकरण याची देशाला नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे भागभांडारात ते हवेतच. त्याचबरोबर ओएमबीसीचाही समावेश हवा. 

सर्वच शेअर्स घसरत असल्याने ग्राफाईट इंडिया व हेगही त्याला अपवाद ठरले नाहीत. ग्राफाईट इंडिया 804 रुपयाला व हेग 3247 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ते येथून 40 टक्के वाढू शकतात. बजाज फायनान्ससारखा सर्वोत्कृष्ट शेअरही शुक्रवारी 1964 रुपयांपर्यंत उतरला होता. त्याचे तिमाही आकडे नोव्हेंबरच्या मध्याला येतील तेव्हा तो निदान 300 ते 350 रुपयांनी वर जावा. 

बरेच शेअर्स उतरले असले तरी त्यामानाने विंध्या टेलिलिंक्स व स्टरलाईट टेक्नॉलॉजीज उतरले नाहीत. विंध्या टेलि 1270 रुपयाला व स्टरलाईट टेक्नॉलॉजी 294 रुपयाला मिळत आहेत. ते अनुक्रमे 1600 रुपये व 380 रुपयांपर्यंत चढू शकतील. वेदांत हा शेअर  पडझडीत टिकून आहे. सध्या तो 231 रुपयाला मिळत आहे. अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोल, ऊर्जा, लोहमाती अशी अनेक तिची उत्पादने आहेत. 

सध्याची शेअर बाजाराची स्थिती भल्याभल्यांनाही चकवणारी आहे. भाव वर जायला लागले की ते आणखी वर जातील असा लोभ (ॠठएएऊ) निदेशकांना गुंगवतो व पडू लागले तर आणखी पडतील या भीतीने (ऋएअठ) तो गुंतवणूक करायला घाबरतो. अशावेळी गुंतवणूकदाराने अल्पमुदती नफ्याऐवजी दीर्घमुदती नफ्यावर लक्ष ठेवायला हवे. एकदोन तिमाही आकड्यांमुळे हुरळून जाण्याचे किंवा हळहळण्याचे कारण नाही. बाजारात दुर्दम्य आत्मविश्‍वास असेल व ‘क्या खाना तो गम खाना’ अशी प्रवृत्ती असेल तरच टिकून राहता येते. त्यामुळे संयम, सातत्य, सबुरी व अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवेत. शेअर्सची संख्या वाढवू नये. दहा ते बारा शेअर्स अगदी कोटी कोटी रुपयांच्या भांडारासाठीही पुरेसे असतात.