Wed, Feb 20, 2019 15:44होमपेज › Arthabhan › संयम व सातत्याची आवश्यकता 

संयम व सातत्याची आवश्यकता 

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 08 2018 7:26PMगेल्या आठवड्यातली अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चाच्या दीडशे टक्के चौदा पिकांवर देऊन शेतकर्‍यांना संतुष्ट केले आहे. शेअर बाजारावर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कालांतराने दिसेल. पुढील महिन्यात 8 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेला आता महागाई वाढेल असे सांगून रेपो दर पाव ते अर्धा टक्‍का वाढवता येईल. सुमारे 17500 कोटी रुपयांचा हा बोजा असेल. 2022 सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारने जाहीर केले होते. या किमान हमीदर वाढीमुळे त्यापैकी पन्नास टक्के आत्ताच त्यांना मिळतील. त्यामुळे उत्साहित होऊन शेतकर्‍यांनी उत्पादकता वाढवली तर आपोआपच उत्पन्न दुप्पट होईल. कृषी क्षेत्रातील वाढवलेल्या हमीदरामुळे निर्यातीवर विपरीत परिणाम होईल. 

विशेषतः तांदूळ व कापसाची निर्यात कमी होईल. गेल्या वर्षी भारताने 7.8 अब्ज डॉलर्सच्या तांदळाची निर्यात केली होती. आता डॉलरचा विनिमय सुधारून पुन्हा 66 रुपयांपर्यंत आला तर निर्यातीचा भाव कमी दिसेल. कापसाची किंमतही 40200 रुपये टनाऐवजी 51600 रुपये होईल व निर्यात करण्याची उमेद संपून जाईल. गेल्या वर्षी 19.3 अब्ज डॉलर्सची कापूस, धागे व कपड्याची निर्यात झाली. अर्थव्यवस्थेला निर्यात कमी होण्याबरोबर घसरत्या रुपयाचाही धक्‍का बसणार आहे. आयात होणार्‍या वस्तू महाग होतील. त्यातून पेट्रोलची किंमत बदलत राहिली तर अर्थव्यवस्था पुन्हा नाजूक होईल. 

पण रेपो दर वाढीमुळे व्याजवाढीचे चक्र सुरू होईल व त्यामुळे बाजार निरुत्साही राहील. कंपन्यांचे जून, सप्टेंबर व डिसेंबर तिमाहीचे विक्री व नफ्याचे आकडे उत्तम आले तरच निर्देशांक व निफ्टी वाढेल पण नफ्याची अपेक्षित वाढ हेग व ग्राफाईट इंडिया कंपन्यांसाठी मोठी असणार असल्याने त्याचे भाव रोज वाढत आहेत. ग्राफाईट इंडियाने 1000 रुपयांचा भाव गेल्या आठवड्यात दाखवला होता. शुक्रवारी तो 941 रुपयावर बंद झाला. त्याचे डिसेंबरपर्यंतचे लक्ष्य 1200 रुपये आहे. हेगने 3700 रुपयांचा वर्षभरातील कमाल भाव दाखवला व तो शुक्रवारी 3550 ते 3650 रुपयांत फिरून 3588 ला बंद झाला. वर्षभरातील त्याचे लक्ष्य 4600 रुपये आहे. त्यामुळे थोडे भाव उतरतात तेव्हा हे दोन्ही शेअर्स जरुर घ्यावेत. 

गेल्या शुक्रवारी निफ्टी 10772 वर तर निर्देशांक 35657 वर बंद झाला. आता 15 तारखेनंतर अनेक कंपन्यांचे जून तिमाहीचे विक्री व नक्‍त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होतील तसतसे ते शेअर्स वर जातील. गेल्या आठवड्यात गृह वित्त कंपन्याचे शेअर्स दोन ते चार टक्क्यांनी उतरले. दिवाण हाऊसिंग फायनान्स 618 रुपयांवर शुक्रवारी बंद झाला तर इंडिया बुल्स हाऊसिंग 1140 रुपयावर स्थिरावला. कॅनाफेन होम्स 339 वर बंद झाला. हे तिन्ही शेअर्स जानेवारी 2019 अखेरपर्यंत किमान 15 टक्क्याने वाढावेत व त्यादृष्टीने अजूनही खरेदी योग्य वाटतात. येस बँक हळूहळू वाढून आता 353 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकिंग क्षेत्रात हा एकच शेअर घेण्यासारखा आहे. पेट्रोलचे जागतिक भाव मोठ्या प्रमाणावर वाढणार नाहीत त्यामुळे हे शेअर्स स्थिरच आहेत. त्यातला चेन्नई पेट्रो 300 रुपयाला मिळत आहे व तो घेण्यासारखा आहे. ओएनजीसी 156 ते 160 रुपयांत फिरत आहे. 

येत्या आठवड्यात ज्यांचे जून तिमाहीचे आकडे प्रसिद्ध होणार आहेत. त्यातील प्रमुख कंपन्यांची यादी पुढे दिली आहे. (कंसात तारीख आहे.) इंडुसिंड बँक (10 जुलै), टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी 10/7), थ्री आय इंफो (13/7), अमल (13/7), इंफोसिस (13/7), अशोक लेलँड (17/7), बजाज फायनान्स (19/7).मे महिन्यात वस्तू सेवाकराचा महसूल 95610 कोटी रुपये झाला. या हिशोबाने केंद्र व राज्य सरकारचा महसूल 2018-19 वर्षासाठी 13 लक्ष कोटी रुपये व्हावा. सध्या अल्कोहोल, पेटोलियम, इलेक्ट्रिसिटी व स्थावर जिंदगीवर वस्तू सेवाकर नाही. तो लावला गेला तर या क्षेत्रातील कंपन्यावर परिणाम होईल. पण तो सकारात्मक असेल का नकारात्मक असेल याचा अंदाज करणे कठीण आहे. जुलै पंधरापासून कंपन्यांचे आकडे जसजसे येऊ लागतील तसतसा त्यांचा परामर्श घेता येईल पण गृह वित्त कंपन्या, खासगी बँका, नॉन-बँकिंग फायनान्स, धातू (पोलाद, तांबे, अ‍ॅल्युमिनियम, जस्त, मॅगेनीज) या कंपन्यांकडे लक्ष देणे हितावह ठरेल. या सर्व कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवत आहे. ग्राफाईट व पोलाद क्षेत्रात चीनची स्पर्धा असणार नाही. 

जून महिन्यात फॅक्टरी मॅन्युफॅक्‍चरिंग निर्देशांक वाढला होता. बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढले आहे. त्यामुळे एप्रिल-जून तिमाहीचे विक्रीचे आकड्यात वाढ दिसेल व त्याच प्रमाणात ढोबळ व नक्‍त नफ्यातही वाढ व्हावी. त्यामुळे बाजारात तेजी दिसायला हवी. पण बाजार सर्वस्वी याच दोन गोष्टींवर अवलंबून नसतो. निवेशकांची निवड व दलालांची लहर या गोष्टीवरही किंमती अवलंबून असतात. म्हणूनच हेगसारख्या शेअरलाही कधीकधी खालचे सर्किट लागते. अशावेळी सर्किट सुटताच थोडी खरेदी करायला हवी. बाजाराला कमी-जास्त व्हायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वक्‍तव्यापासून ते रिझर्व्ह बँकेच्या रेपोदरापर्यंत काहीही कारण पुरते. त्यामुळे खरेदी-विक्री करताना संयम व सातत्याची आवश्यकता असते. तसेच खरेदी केल्यानंतर दोन-चार दिवसांत अपेक्षित लक्ष्य (target)  गाठले जाईल, असे होत नाही. शिवाय अनेक ठिकाणांहून अनेक ‘टिप्स’येत असतात. त्यावर किती अवलंबून रहायचे हाही एक यक्षप्रश्‍न असतो. सर्वात उत्तम गमक म्हणजे दर तिमाही येणार्‍या आकडेवारी व त्यातून निघणारे निष्कर्ष!तरीही एक गोष्ट नक्‍की. शेअर बाजाराखेरीज अन्यत्र कुठेही भरघोस वाढ शक्य नसते. कंपन्यांमधील गुंतवणुकीत हल्‍ली जास्त जोखीम असते व द्रवताही नसते. याउलट बँकाकडील व्याज हे फारच तुटपुंजे असते. 

चकाकता हिरा : ‘अरबिंदो फार्मा’

यावेळचा चकाकता हिरा म्हणून औषध क्षेत्रातील अरबिंदो फार्माचा उल्‍लेख करता येईल. सध्या हा शेअर 615 ते 620 रुपयाच्या दरम्यान मिळत आहे. वर्षभरात तो 765 ते 780 रुपयांपर्यंत जावा. ही भाववाढ 24 ते 25 टक्के दिसेल. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 15 पट आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 809 रुपये व 527 रुपये होते. रोज सुमारे 18 ते 20 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. मार्च 2018 च्या तिमाहीसाठी तिचा नक्‍त नफा 529 कोटी रुपये होता. गेल्या मार्च 2017 तिमाहीसाठी तो जवळपास तिथेच म्हणजे 532 कोटी रुपये होता. विक्री 3989 कोटी रुपये होती. तिची युरोप व अमेरिकेतली विक्री 70 टक्के आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या संदर्भात बरसत आहे. याचा तिला गेल्या सहा महिन्यात फायदा मिळेल. तिने यंदा 478  ANDS  ची अमेरिकेतील फूड अँड ड्रग्ज असोसिएशन  (FDA)  कडे नोंद केली आहे. त्यापैकी 30 ते 40 टक्के औषधांची ती यावर्षीचे उत्पादन करून विक्री करेल. तिचे 2017 व 2018 मार्च वर्षाचे प्रत्यक्ष व 2019 आणि 2020 मार्च वर्षाचे संभाव्य आकडे खाली दिले आहेत. (आकडे कोटी रुपयांत आहेत) त्यात ते 2 ते 5 टक्के फरक पडू शकेल. 

हैद्राबादमधील HITRE CITY  भागात तिचे मुख्य कार्यालय व कारखाना आहे. 1986 साली ती स्थापन झाली. तेव्हापासून दर्जेदार औषधे उत्पादन करणारी असा तिचा लौकिक आहे. तिची अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने तिकडच्या फूड अँड ड्रग्ज असोसिएशनकडून तिची सतत कडक तपासणी होते व उत्पादन करताना पर्यावरण, स्वच्छता, दर्जा, कच्चा माल, श्रमिकांची उत्पादकता व स्वच्छता याबद्दल कटाक्षाने लक्ष दिले जाते. अरबिंदो फार्मा नावाने तिची अमेरिकेत उपकंपनी आहे. अँटिबायोटिक्स, सेट्रेल नर्व्हस सिस्टिम्स, अँटि-अलेर्जिक्स, अँटि-रेट्रोव्हायरस व कार्डियो व्हॅस्क्युलर विभागातल्या औषधाचे तिचे उत्पादन आहे. अमेरिकेतील FDA कडून तिच्यावर कधीही ठपका ठेवला गेलेला नाही. 

जगातल्या 125 देशांत तिची उत्पादने निर्यात होतात. अ‍ॅस्ट्राझेनेका व फायझरतर्फे तिची निर्यात होत असते. तिच्या संचालक मंडळावर पी. व्ही. रामप्रसाद रेड्डी, के. नित्यानंद रेड्डी, मदनमोहन रेड्डी, श्री. राममोहन रेड्डी आहेत. मार्च 2017 मध्ये तिच्याकडे 16000 कर्मचारी/शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ कामाला होते. 1992 साली कंपनी खासगी न राहता पब्लिक झाली व 1995 साली तिची शेअर बाजारावर नोंद झाली. कंपनीचे शेअर्स 600 ते 800 रुपयांच्या पातळीत वर्षानुवर्षे फिरत आहेत. 

डॉ. वसंत पटवर्धन