Mon, Nov 20, 2017 17:18होमपेज › Arthabhan › नोकरदार महिलांसाठी गुंतवणूक पर्याय 

नोकरदार महिलांसाठी गुंतवणूक पर्याय 

Published On: Nov 13 2017 2:01AM | Last Updated: Nov 12 2017 10:50PM

बुकमार्क करा

वनिता कापसे

वयाची तिशी ओलांडल्यानंतर जीवनात बर्‍यापैकी स्थिरता आलेली असते. मग ती कौटुंबिक असो किंवा आर्थिक असो. विशेषत: महिलांसाठी घराची जबाबदारी सांभाळून नोकरी करणे ही तारेवरची कसरत मानली जाते. नोकरदार महिलांना पाल्यांचे शिक्षण, घरखर्चाची जबाबदारी, सणवार, कौटुंबिक सोहळे, विमा हप्ते यांचा ताळमेळ बसवताना आर्थिक गणिताची आकडेमोड करावी लागते. याच काळात मजबूत आर्थिक गुंतवणुकीचा पाया रचण्याची नामी संधी असते. त्याचबरोबर विविध पातळ्यांवर आर्थिक गुंतवणूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण घरखर्चाची विभागणी करताना कधीकधी घराच्या हप्त्याची जबाबदारी महिलांवर येते. तरीही अशा काळातही गुंतवणूक सुरूच ठेवावी लागते. साथीदारही चांगला कमावता असेल तर महिलांंना फारशी आर्थिक झळ बसत नाही आणि पर्यायाने नोकरदार महिला आपले उत्पन्न गुंतवणुकीकडे आणि पाल्यांच्या शिक्षणाकडे वळवू शकते. शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास भविष्यात उद्भवणार्‍या आर्थिक आव्हांनांना सामोरे जाण्याची गरज भासत नाही. याठिकाणी नोकरदार महिलांनी काही पथ्य पाळल्यास किंवा टिप्सचे पालन केल्यास आर्थिक चणचण भासण्याची शक्यता कमीच . 

आपत्कालीन निधी : नोकरदार महिलांनी आपला पैसा आलिशान गाडी किंवा महागड्या वस्तू खरेदीवर खर्च करू नये. अशा प्रकारची कृती महिलांना आर्थिक संकटात नेऊ शकते. अपवादात्मक गृहकर्ज. कारण गृहकर्ज ही करसवलत देणारी बाब होय. म्हणूनच महिलांनी आपल्या उत्पन्नातील काही रक्‍कम आपत्कालीन निधीसाठी बाजूला काढून ठेवल्यास ऐनवेळी उडणार्‍या धावपळीपासून मुक्‍तता मिळू शकते. शैक्षणिक शुल्क, प्रवास, आजारपण यांसारख्या अचानक गोष्टींसाठी पैशाची जुळवाजुळव सुरुवातीपासून केल्यास कोणत्याही परिस्थितीवर सहजपणे मात करू शकू. हा पैसा किमान सात ते आठ महिन्यांच्या होणार्‍या किमान खचार्र्एवढा असावा. 

विमा संरक्षण : नोकरदार महिलांनी विम्याचा विचार करावा. बहुतांशी महिला या कर्मचारी विम्यावर किंवा फॅमिली फ्लोटर योजनेवर अवलंबून असतात. परंतु अशा प्रकारचे विमा संरक्षण अपुरे पडू शकते. त्यामुळे नोकरदार महिलांना वेगळी विमा योजना काढण्याचा विचार करावा. याशिवाय संपूर्ण आयुष्याला संरक्षण कवच देणार्‍या टर्म इन्शुरन्सचा आणि हेल्थ इन्शुरन्सचा विचार करावा. गंभीर आजारासाठी अशा प्रकारच्या विमा पॉलिसीची नितांत गरज असते. महिलांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विम्या पॉलिसीचा समावेश करण्याबाबत आग्रही असावे. 

निवृत्तीचा विचार : वयाची तिशी पार केल्यानंतर निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा.दीर्घकाळासाठी लवकर गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीच्या काळात बर्‍यापैकी धनसंचय होतो आणि तो निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी आणि मुलांच्या शिक्षण, लग्नासाठी उपयुक्‍त ठरतो. इक्विटी, पीपीएफ, पेन्शन प्लॅन याशिवाय करसवलत देणार्‍या विविध योजनेत गुंतवणूक करून आर्थिक हमी मिळवावी. महागाई दराच्या तुलनेत अधिक परतावा देणार्‍या म्युच्युअल फंड, शेअर बाजार, करसवलत देणारे सरकारी बाँड यांचा विचार करावा. महिलांनी केवळ मुदतठेव किंवा रिकरिंग डिपॉझिटचा विचार न करता शेअर बाजाराचा अनुभव घ्यावा. अर्थात यासाठी दीर्घकाळाचा विचार करायला हवा. शेअर बाजारात कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळलेच याची हमी देता येत नाही. मात्र पाच ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळतो. 

जोखीम पत्करण्याची तयारी ठेवा : नोकरदार महिलांनी जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी. केवळ सोने, चांदी किंवा मुदतठेवीचा विचार न करताना आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर बाजारसारख्या गुंतवणुकीचा विचार करावा. अर्थात जादा व्याज देणार्‍या मुदत ठेवीच्या मोहात पडणे चुकीचे आहे. बँकेची वैधता आणि विश्‍वासार्हता तपासूनच मुदतठेवीचा विचार करायला हवा. अत्यावश्यक गरजेसाठी पैसा बाजूला काढून उर्वरित रक्‍कम बचत म्हणून नव्हे तर गुंतवणूक म्हणून विचार करावा. 

संतुलित पोर्टफोलिओ : जेव्हा नोकरदार महिला गुंतवणुकीचा विचार करतात तेव्हा आपला पोर्टफोलिओ संतुलित कसा राहील याचाच विचार करायला हवा. इक्विटी, पीपीएफ, मुदतठेव, रिकरिंग डिपॉझिट, सोने यात थोडी थोडी गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. तसेच बाजारात पोर्टफोलिओची किंमत वाढताच थोडा नफा काढून घेणे महत्त्वाचे ठरते. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीत सातत्य कसे राखले जाईल, याचा विचार करावा. पगार चांगला आहे म्हणून अतिगुंतवणूक करू नये. कदाचित आपत्कालीन स्थितीसाठी पैशांची गरज पडली तर आपल्याला गुंतवणूक थांबवता येत नाही किंवा दंड भरावा लागतो. त्यामुळे किमान गुंतवणूक ही आपल्याला सातत्य राखण्यास मदत करते.