Wed, Oct 24, 2018 02:14होमपेज › Arthabhan › ‘सिमेंट,पोलाद, हौसिंग’मध्ये व्हावी गुंतवणूक

‘सिमेंट,पोलाद, हौसिंग’मध्ये व्हावी गुंतवणूक

Published On: Dec 04 2017 1:50AM | Last Updated: Dec 03 2017 9:07PM

बुकमार्क करा

निश्‍चलनीकरणानंतर प्राप्‍तिकर विवरणपत्र भरणारांची संख्या वाढली असल्याचा दावा जरी अर्थमंत्र्यांनी केला असला तरी त्यामुळे करसंकलन वाढलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. दीड महिन्यापूर्वी सरकारने खूप मोठे स्टिम्युलस जाहीर केले असले तरी त्या रकमा कागदावरच आहेत. बँकांच्या भांडवलात सरकार लवकर भर घालील अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे ‘बोलाचीच कढी। बोलाचाच भात। खाऊनिया तृप्त। कोण झाला॥’ हे म्हणणे खरे ठरत आहे. अरुण जेटली हे अर्थव्यवस्थेला चालना देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत. एकाही क्षेत्रात ठोस अशी गुंतवणूक आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार अशी स्थिती आहे व शेअर बाजारात संथपणा आला आहे. 

पावसाळा आता संपल्याने महामार्ग, निवासिका वगैरे कामे जोरात सुरू व्हावीत. सिमेंटची मागणी वाढायला हवी. पण अर्थव्यवस्थेचा गाभा असलेले आठ जे महत्त्वाचे उद्योग आहेत, त्यापैकी सिमेंट व पोलाद व्यवसायात फारशी हालचाल नाही. तिथे मरगळच आहे. ऑक्टोबर महिन्यात ही आठ व्यवसाय क्षेत्रे फक्‍त 4.7 टक्केच वाढली. सिमेंटचे उत्पादन 2.7 टक्क्याने कमी झाले. पोलादामध्ये ऑक्टोबर 2016 पेक्षा ऑक्टोबर 2017 मध्ये 8.4 टक्क्याने कमी वाढ झाली. पण खउठ च्या एका अहवालाप्रमाणे याच्यापुढे पोलादक्षेत्र सुधारेल. आतापर्यंत ज्या कंपन्यांचे या आर्थिक वर्षातील दुसर्‍या तिमाहीचे विक्रीचे व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार अर्थव्यवस्थेची वाढ 6.3 टक्क्यापर्यंत सुधारली आहे. 

उत्तर प्रदेशामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. त्या होईपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये विजेचे दर वाढवले गेले नव्हते. आता हे दर 12.73 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आपल्या नव्याने विक्रीस काढलेल्या कर्जरोख्यांची लंडनच्या शेअरबाजारावर नोंदणी केली आहे. नुकतेच 40 कोटी डॉफर्सचे हे बाँडस् 3.75 टक्के व्याजदराने विक्रीला काढले गेले आहेत. सध्या जरी अर्थव्यवस्थेत मरगळ असली तरीही 2030 सालापर्यंत अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. पण सध्या तरी ही शक्यता कमीच आहे. 

पेट्रोलियमचे उत्पादन व निर्यात करणार्‍या ओपेक राष्ट्रांनी पुढील बारा महिने तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले आहे. पेट्रोलचे भाव यापुढे वाढणे शक्य असले तरी वाढत्या भावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण पडेल. एच.डी.एफ.सी., ए.एम.सी. कंपनीने  आपली प्राथमिक भाग विक्री जाहीर केली आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळावा. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत वित्तीत तूट वाढल्याने शेअरबाजाराचा निर्देशांक गेल्या आठवड्यात 453 अंकाने घसरला तरीही अमेरिकेतील एका गुंतवणूक संस्थेने भारतीय शेअरबाजाराचा निर्देशांक 2018 अखेर 40,000 पर्यंत जाण्याचे भाकीत केले आहे. गेल्या आठवड्यात दिवाण हौसिंग फायनान्समध्ये थोडी सुधारणा होऊन शेअरचा भाव 622 रुपयांपर्यंत गेला आहे. बजाज फिनसर्व्ह 5250 च्या मागेपुढ फिरत आहे. इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सचा शेअर 1175 रुपयांच्या आसपास स्थिर आहे. सोन्याचा भाव 632 रुपयांपर्यंत वाढला आहे. रेप्को होमही याच भावाला स्थिर आहे. चोलमंडलम् इन्व्हेस्टमेंट अँड फिनान्स कंपनीचा शेअर 1300 रुपयांच्या आसपास आहे. बजाज फायनान्स 1730 रुपयांच्या आसपास आहे. फ्युचर रिटेल 550 रुपयांपर्यंत मिळत आहे तर अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टस् (डी मार्ट) 1128 रुपयांपर्यंत स्थिर आहे. हे दोन्ही शेअर्स सध्या घेऊन ठेवले तर वर्षभरात तीस टक्के वाढतील.  गेल्या बारा महिन्यांत 840 रुपयांपर्यंत वाढलेला कॅपिटल फर्स्ट हा शेअर 706 रुपयांपर्यंत उतरल्याने खरेदीसाठी योग्य आहे. वर्षभरात त्यात तीस टक्के वाढ होऊन तो 925 रुपयांपर्यंत वाढेल. पंजाब नॅशनल हौसिंग फायनान्समधील आपली गुंतवणूक पंजाब नॅशनल बँक कमी करणार आहे. त्यामुळे वर्षभरात पंजाब नॅशनल बँकेच्या भावात चांगली वाढ होईल.  एच ई जी सध्या 1750 रुपयाला उपलब्ध आहे तर ग्राफाइड इंडस्ट्रीज 600 रुपयांच्या मागेपुढे फिरत आहे. येत्या सहा आठवड्यांत या दोन्ही कंपन्यांनी आपले 2018 सालासाठीचे भाव जाहीर केले, की कंपनीच्या शेअर्सचे उत्तरायण सुरू होईल. पुढील तीन महिन्यांत या शेअर्समध्ये किमान 15 टक्के वाढ व्हावी. 

सागर सिमेंटस्
यावेळचा ‘चकाकता हिरा’ म्हणून ‘सागर सिमेंटस्’चा उल्‍लेख करावा लागेल. पावसाळा आता संपलेला असल्याने बांधकामे व महामार्ग या क्षेत्रात कामे वाढतील. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सिमेंट व पोलादाची जरूरी भासेल. डिसेंबर ते जून 2018 पर्यंत त्यामुळे सिमेंटचे कारखाने जास्त उत्पादन करतील. महाकाय सिमेंट कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटस्, अंबुजा सिमेंटस्, ए. सी.सी. श्री सिमेंटस्, तर मध्यम आकाराच्या कंपन्यांत इंडिया सिमेंटस्, सागर सिमेंटस्, मंडलम् सिमेंटस् व लहान कंपन्यांत प्रिझम सिमेंटचा उल्‍लेख करावा लागेल. 

यापैकी सागर सिमेंटस् गुंतवणूकदारांना येत्या बारा महिन्यांत चांगला नफा देऊन जाईल. सध्या या शेअरचा भाव 867 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव 610  रुपये होता. सध्या साधारण 35 ते 40 हजार शेअर्सचा व्यवहार होतो. सागर सिमेंटस्ची 2016 व 2017 मार्च वर्षाची विक्री अनुक्रमे 753 कोटी रुपये व 814 कोटी रुपये होती. 2018, 2019 व 2020 मार्च वर्षाची संभाव्य विक्री अनुक्रमे 1060 कोटी रुपये, 1270 कोटी रुपये व 1600 कोटी रुपये व्हावी. 2016 व 2017 मार्चसाठीचा करोत्तर नफा अनुक्रमे 44 कोटी रुपये व 4 कोटी रुपये तोटा होता. येत्या तीन वर्षांचा संभाव्य नफा अनुक्रमे 53 कोटी रुपये, 106 कोटी रुपये व 190 कोटी रुपये व्हावा. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर -431 पट आहे. मार्च 2018 मध्ये ते सुधारून 32 पट होईल आणि मार्च 2019 व मार्च 2020 साली हे गुणोत्तर सुधारून 16 पट व 9 पट व्हावे. गुंतलेल्या भांडवलावर 2020 मार्चमध्ये 17 टक्के परतावा मिळावा. येत्या तीन वर्षांत कंपनी आपल्या खर्चाचे प्रमाण बरेच कमी करणार आहे. 2018 मार्च, 2019 मार्च व 2020 मार्चसाठीचा संभाव्य नफा अनुक्रमे 52 कोटी रुपये, 104 कोटी रुपये व 185 कोटी रुपये व्हावा. सध्या गुंतवणूक केल्यास वर्षभरात 32 टक्के नफा व्हावा. पुढील बारा महिन्यांत शेअरचा भाव सुमारे 1125 रुपये व्हावा. निर्देशांक फारच मोठ्या प्रमाणात वाढला तर सागर सिमेंटचा भाव 1500 रुपयेही होऊ शकतो. पण गुंतवणूकदारांनी 1150 रुपयांचीच माफक अपेक्षा ठेवावी. सध्याच्या भावावर 70 टक्के नफा 1 वर्षात मिळू शकेल. 

कंपनी आपले उत्पादन पुढील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे. उत्पादन खर्च कमी होईल तशी कंपनीची नफा क्षमता वाढणार आहे. सागर सिमेंट ही कंपनी प्रामुख्याने दक्षिण भारतात अग्रेसर आहे. 1985 साली अविभाजीत आंध्र प्रदेशात तिची स्थापना झाली. पोर्टलंड सिमेंटचे तिचे प्रामुख्याने उत्पादन आहे. सध्याची तिची दळणक्षमता 43 लाख टनाची आहे. तामिळनाडू, कर्नाटक व केरळमध्ये तिची प्रामुख्याने विक्री होते. 

डॉ. वसंत पटवर्धन