Fri, Jul 03, 2020 23:09होमपेज › Arthabhan › गुंतवणूक सावधानता जोपासताना...

गुंतवणूक सावधानता जोपासताना...

Last Updated: Nov 04 2019 1:06AM
डॉ. विजय ककडे

गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांबाबत माहिती असणे व याबाबतही फसवणूक, चुका होऊ नये यासाठी काही पथ्ये महत्त्वाची ठरतात. शेअर्स किंवा समभाग आणि त्यावर आधारित म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवे पर्याय गुंतवणूकदारास अधिक सोईचे दीर्घकाळात चांगला परतावा देणारे ठरू शकतात. पण त्यासाठी वित्तीय शिस्त महत्त्वाची ठरते.

गुंतवणुकीबाबत असणारी अर्थनिरक्षरता आणि अंधविश्‍वास यातून होणारे नुकसान टाळणे ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरते. यासाठी गुंतवणुकीतील चकवे, फसवणुकीचे मायाजाल व त्यापासून दूर राहणेच्या उपाययोजना या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. आयुष्यभर काटकसर करून व आठवड्यातील सात दिवस काम करूनही आर्थिक स्थैर्य असणारे हे सर्व कोणत्या ना कोणत्या फसगतीची शिकार झालेले असतात. प्रथम आपण कोणत्या कारणासाठी किंवा आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक करणार आहे; हेच स्पष्ट नसेल तर, बस स्टँडवर गेलात आणि कोणत्या गावी जायचे हेच ठरले नसेल तर जसे होते तीच अवस्था निर्माण होते. प्रवासास लागणारा कालावधी, अंतर व आपले बजेट यावर जसे वाहनाची निवड करतो तसेच गुंतवणूक उद्दिष्टानुसार साधन निवडणे योग्य ठरते. जवळच्या प्रवासाला दुचाकी, मोठ्या प्रवासाला बस किंवा रेल्वे व फार मोठ्या प्रवासास विमान, अशी वाहन निवड आपण करतो पण गुंतवणुकीबाबत मात्र असे करत नाही. याचे कारण आपण आर्थिक ध्येयनिश्‍चितीच केलेली नसते. पुढच्या एक वर्षात, पाच वर्षात, दहा वर्षात, तीस वर्षात कोणत्या आर्थिक जबाबदार्‍या असतील व त्यासाठी कोणती व किती गुंतवणूक करावी हे प्रथम ठरवणे ही पहिली पायरी गुंतवणूक चकवा टाळणेस आवश्यक ठरते. 

गुंतवणुकीबाबत घाऊक प्रमाणात, सार्वत्रिक स्वरूपात दिसणारी महत्त्वाची चूक ही ‘विमा’ निवडीबाबत दिसते. विमा हे जोखीम व्यवस्थापनाचे तंत्र असून अपघात, अपंगत्व, मृत्यू अशा आपत्तीतून आर्थिक नुकसान टाळणेसाठी संरक्षक कवच असे विम्याचे स्वरूप असते. विमा पुरेशा प्रमाणात असणे व त्याचा हप्‍ता किंवा खर्च कमी असणे, विमा कंपनी  विश्‍वासार्ह असणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. परंतु विमा व गुंतवणूक अशी संमिश्र निवड एंडोमेंट पॉलिसी किंवा युलिपसारख्या साधनातून केली जाते. खरे तर विमा संरक्षण व गुंतवणूक या बाबी स्वतंत्रपणे हाताळणे हेच लाभदायी असते. विमा व गुंतवणूक अशा संमिश्र निवडीतून आपण धड विमा नाही व धड गुंतवणूक नाही, अशा विचित्र टप्प्यात येतो. व्यापक विमा संरक्षण देणारे ‘टर्म इन्शुरन्स’ कमी खर्चात उपलब्ध होतात. परंतु एजंटमार्फत मात्र त्यांना भरघोस कमिशन देणार्‍या योजनाच गळी उतरवल्या जातात. हे लोक आपले जवळचे मित्र, नातेवाईकच असतात. विमा गुंतवणुकीचा परतावा जर पाहिला तर तो 3% ते 4% राहतो व हेच पैसे इतर चांगल्या योजनेत गुंतवले असते तर 6 ते 8% परतावा मिळाला असता. याचाच अर्थ, आपण अर्धे उत्पन्‍नच घेतले व अर्धे हरवले असाच होतो! मैत्रीसाठी, नाते संबंधासाठी निवडली जाणारी गुंतवणूक साधने आपण त्यांच्या फायद्यासाठी घेतो व आपले नुकसान करून घेतो. आपल्या व्यवसायातील धोके, आरोग्याचे प्रश्‍न, उत्पन्‍न पातळी व त्यातील चढउतार, उत्पन्नातील सातत्य हे सर्व पाहूनच योग्य विमा निवडणे युक्‍त ठरते. कारण विम्यापासून होणार्‍या रकमेला पुनर्विमा घेणे व्यक्‍तिगत पातळीवर अशक्य आहे. 

बँक ठेवी, पोस्टाच्या विविध बचत योजना या सुरक्षिततेच्या निकषांवर अधिक चांगल्या ठरतात. परंतु अलिकडच्या काळात पीएमसीसारखी बँकदेखील अडचणीत आल्यानंतर गुंतवणूकदारांच्या मनात ‘बँक ठेवी’ सुरक्षित आहेत का? अशी शंका येत आहे. ठेव हमी महामंडळामार्फत एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना सरकारचे विमा संरक्षण असून त्यापेक्षा अधिकची ठेव ही असंरक्षित किंवा जोखीम असणारी आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध बँकांत (शाखेत नव्हे) एक लाखापर्यंत ठेवी ठेवणे हा एक पर्याय ठरू शकतो. बँक ठेवीवरील परतावा हा जवळपास महागाई दराइतकाच असलेने दीर्घकालीन गुंतवणुकीचे ते योग्य साधन ठरत नाही.

कमी जोखीम असणार्‍या इतर पर्यायांचा विचार करून व आपली जोखीम क्षमता व मानसिकता पाहून अन्य पर्याय निवडणे हे लाभता व स्थिरता देऊ शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (झझऋ), सरकारचे बाँडस् हे आणखी काही पर्याय सुरक्षित गुंतवणूक स्वरूपात पाहता येतील. स्थानिक पातळीवर सुवर्णभिशी व ठेवी या गुंतवणूक योजना ‘गुडविन’प्रमाणे अडचणीत येऊ शकतात, हे लक्षात घेतल्यास गुंतवणूक करीत असताना आपण अधिक परताव्याच्या अपेक्षेने मुद्दल हरवण्याची जोखीम स्वीकारत असतो. अशा योजनांचे पेव अगदी ग्रामीण पातळीवर पोहचले असून अलिकडच्या काळातील मेकर, पॅनकार्ड, पॅनक्‍लब, पर्लस, मैत्रेय, केबीसी (नाशिक), टिंक्‍वल अशा योजनांतून कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. ‘जंगलातील अधिक आकर्षक फळे, फुले विषारी असतात’ हा नियम अधिक परतावा खात्री देण्याच्या सर्व योजनांना लागू पडतो. 

गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांबाबत माहिती असणे व याबाबतही फसवणूक, चुका होऊ नये यासाठी काही पथ्ये महत्त्वाची ठरतात. शेअर्स किंवा समभाग आणि त्यावर आधारित म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवे पर्याय गुंतवणूकदारास अधिक सोईचे दीर्घकाळात चांगला परतावा देणारे ठरू शकतात. पण त्यासाठी वित्तीय शिस्त महत्त्वाची ठरते. वॉरेन बफे या गुंतवणुकीतील महागुरूंनी ज्या कंपनीचा व्यवसाय तुम्हास समजत नाही, त्या कंपनीचा शेअर घेऊ नका असा सल्‍ला दिला आहे. याचाच अर्थ ज्या कंपन्या सातत्याने व कायमस्वरूपी लागणार्‍या वस्तू व सेवा पुरवतात, अशाच कंपन्या गुंतवणुकीस निवडाव्यात. अशा गुंतवणुकीत सर्वसामान्य गुंतवणूकदाराकडून होणारी ‘घाई’ हे नुकसानीचे  महत्त्वाचे कारण ठरते.

जेव्हा बाजारात मंदी असते, शेअर बाजार कोसळला अशी बातमी असते तेव्हा खरे तर उत्तम शेअर्स वाजवी दरात उपलब्ध असतात. पण याचवेळी सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणूक काढून घेतो किंवा थांबवतो. ‘सब्र का फल मीठा होता है’ हे साईवचन सही ठरते.  बाजारातील अस्थिरता पाहून भयभीत होऊन अथवा काही गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला म्हणून गुंतवणूक निर्णय घेणे हेही नुकसानकारकच ठरते. सातत्याने खरेदी-विक्री करण्याचे ‘धरसोड’ वर्तन दलालांना नफा देणारे व आपले नुकसान करणारे असते. यासाठी योग्य शेअर अथवा म्युच्युअल फंड घेऊन ते पैशाचे झाड वाढेपर्यंत वाट पाहणे हे योग्य ठरते. बाजारात अचूकवेळी गुंतवणूक करणे व सर्वोच्य पातळीस विकणे ही अंधश्रद्धा असून शिस्तबद्ध, कालबद्ध व सातत्यपूर्ण गुंतवणूक हाच समृद्धीचा मार्ग आहे. 

सिंहावलोकन आवश्यक

गुंतवणुकीबाबत स्वतः निर्धारीत केलेल्या आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक रचना करणे हे कौशल्याचे काम असून त्यासाठी गरजेनुसार तज्ज्ञांचा किंवा ‘गुंतवणूक डॉक्टरांचा’ सल्‍ला आवश्यक ठरतो. बदलत्या गरजा, वाढलेले किंवा घटलेले उत्पन्‍न, बाजारकल यानुसार गुंतवणूक रचना बदलावी लागते यासाठी आपल्या एकूण गुंतवणुकीवर वार्षिक परतावा किती मिळाला याचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. ज्या गुंतवणुकीवर परतावा  घटला त्याची कारणे पाहून वेळीच त्यातून बाहेर पडणे हेही आवश्यक ठरते. आपली गुंतवणूक विविध साधनात, विविध कालावधीत अशी केली असल्यास त्यातून स्थैर्य व वृद्धी दीर्घकाळात साध्य होतात. आपल्या गरजानुरूप गुंंतवणूक करणे, त्याचा आढावा घेणे, कोणत्याही आकर्षक योजनेचा बळी न होणे हीच खरी गुंतवणूक साक्षरता असून पैसे कमावणे जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षा ते सांभाळणे व वाढवणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. गुंतवणुकीतील सावधानता नसेल तर आपण ‘सावज’ म्हणून फसण्याचा धोका निर्माण होतो.