होमपेज › Arthabhan › गृहवित्त, पेट्रोल, पोलादमध्ये गुंतवणूक व्हावी

गृहवित्त, पेट्रोल, पोलादमध्ये गुंतवणूक व्हावी

Published On: Jun 11 2018 1:10AM | Last Updated: Jun 10 2018 9:11PMसेबीने मागच्या आठवड्यात अनेक कंपन्या देखरेखेखाली आहे, असे जाहीर केल्यामुळे बाजाराचा सकारात्मक नूर बदलला आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ करून तो 6.25 टक्के केला आहे. चार वर्षांनी ही वाढ झाली आहे. 2018-19 वर्षासाठी अर्थव्यवस्था 7.4 टक्क्याने वाढेल, असा तिचा अंदाज आहे. महागाई 4.4 टक्क्याऐवजी 4.7 टक्के वाढेल असेही तिला वाटते. ऑगस्ट/ऑक्टोबरमध्येही आणखी पाव टक्क्यांची वाढ शक्य आहे. 

का रण रिझर्व्ह बँकेचा द‍ृष्टिकोन howkish आहे. बँकाही आपले कर्जावरील व्याजदर आता वाढवतील. महागाई वाढेल अशा अंदाजामुळे रिझर्व्ह बँकेने ही वाढ केली असली तरी यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने व तो समाधानकारक असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने महागाई वाढीचे कारण नाही. पावसाळ्यात सर्वसाधारणपणे फळे व भाजीपाला याचे भाव स्थिर असतात. पण महागाईचा बाऊ करण्याची रिझर्व्ह बँकेची ‘लांडगा आला रे आला’ या म्हणीची दर दोन महिन्याने येणारी हाक आता सर्वांच्या पचनी पडली आहे. शेअर बाजारानेही रेपो दरवाढीकडे दुर्लक्ष केले आहे. निर्देशांक शुक्रवारी 35443 वर बंद झाला आणि निफ्टीही 17767 वर बंद झाला. 

शुक्रवारी गुंतवणुकीस योग्य असलेल्या काही शेअर्सचे भाव पुढे दिले आहेत. दिवाण हाऊसिंग 623 रुपये, येस बँक 336 रुपये, बजाज फिनसर्व्ह 6026, भारत फायनान्शियल 1155 रुपये, इंडियन ऑईल कार्पोरेशन 175 रुपये, भारत पेट्रोलियम 410 रुपये, हिंदुस्थान पेट्रोलियम 311 रुपये, जे. कुमार इन्फ्रा 277 रुपये (हा यावेळचा चकाकता हिरा आहे.) इंडिया बुल्स हाऊसिंग 1204 रुपये, मुथुट फायनान्स 391 रुपये, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स 1446 रुपये, ओएनजीसी 174 रुपये, चोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स 1566 रुपये, बजाज फायनान्स 2186 रुपये, फ्युचर रिटेल 563 रुपये, विद्या टेलिलिंक्स 1035 रुपये, मन्नापुरम फायनान्स 107 रुपये, लार्सेन टुब्रो इन्फोटेक 1664 रुपये, ग्राफाईट इंडिया 850 रुपये, गुजरात नर्मदा फर्टिलायझर्स (GNFC)747 रुपये, हेग 3400 रुपये, अशोका बिल्डकॉम 239 रुपये, रेन इंडस्ट्रीज 233 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 162 रुपये, चेन्नई पेट्रो 302 रुपये, केपीआयटी 273 रुपये, इन्फोसिस 1266 रुपये, फोर्स मोटर्स 2724 रुपये, रेप्को होम्स फायनान्स 558 रुपये, कल्याणी स्टील्स 275 रुपये, हिंडाल्को 242 रुपये, व्होल्टॅप ट्रान्सफॉर्मर्स 1030 रुपये, मेघमणी 95 रुपये, वेदांत 246 रुपये.

वर दिलेले शेअर्स दिवाळीपर्यंत जरा वाढणार असले तरी यापैकी गुंतवणूकदारांनी दहापेक्षा जास्त शेअर्समध्ये गुंतवणूक करू नये. तसेच आता तेजीची झुळूक ऑगस्टनंतर दिसणार असल्याने घेतलेले शेअर्स निदान सहा महिने तरी बाळगायला हवेत. रिझर्व्ह बँकेच्या या वेळच्या त्रैमासिक धोरणात बँकांच्या त्रैमासिक द्रवता परिमाणातील  (SLR)कर्जरोख्यांचे मूल्यांकन, खरेदी किंमतीवरून चालू किंमतीला आणण्यासाठी (MTM) (valatile)बँकांना जास्त मुदत दिली गेली आहे. पेट्रोलच्या जागतिक किंमती खूपच अस्थिर (valatile)आहेत. त्यामुळे त्या जशा खाली-वर होतील तशा प्रकारे अर्थव्यवस्थेत फेरबदल होतील, असे रिझर्व्ह बँकेने मत नोंदविले आहे. पण या बाबींकडे शेअसबाजाराने कानाडोळा केला आहे. बाजाराची मदार सध्या पावसाळ्याच्या हालचालीवर राहील. गृहवित्त कर्जामध्येही अनार्जित कर्जे वाढू शकतील व परवडणार्‍या घरांसाठी कर्जे देताना बँकांनी सावधगिरीने पावले टाकायला हवी आहेत, असे तिचे मत आहे. बँकांनी गृहवित्ताबाबत हात आखडता घेतला तर गृहवित्त देणार्‍या नॉन बँकिंग कंपन्यांकडे कर्जदार वळतील. त्या कंपन्यांचा व्यवसाय वाढेल. पण त्याही मग कर्जावरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दिवाण हाऊसिंग फायनान्स, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स, एल. आय. सी. हाऊसिंग फायनान्स यांना 2018-19 वर्षातील दुसरी सहामाही चांगली जावी. सध्या खालच्या भावात हे शेअर्स घ्यायला हरकत नाही. 

पेट्रोलचे भाव वाढत राहिले तर रेन इंडस्ट्रीजवर त्याचा परिणाम होईल. त्यातील वाढ तांत्रिक राहील. याउलट ओएनजीसी, ऑईल इंडिया, चेन्नई पेट्रोलियम या प्रवाहधारेतील वरच्या भागात असलेल्या कंपन्यांना फायदा होईल. पण तेल शुद्धीकरण करणार्‍या कंपन्यांचा मधला गाळा कमी होईल. तरीही भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक हवी. पोलाद क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ने या मार्च तिमाहीत प्रगती दाखवली आहे. त्याचप्रमाणे जिंदाल स्टेनलेस स्टील (हिस्सार) जिंदाल पॉवर अँड स्टील या कंपन्यांनाही येथे वर्ष चांगले जाईल. जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) सध्या 162 रुपयाला आहे. वर्षभरात तो 40 टक्के वाढू शकतो, म्हणून हे शेअर्स जरुर घ्यावेत. मात्र पुढील सहामाहीत राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभाच्या निवडणुकाकडे बाजाराचे बारीक लक्ष असेल. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर कार्यक्रमाला हजेरी लावली ही एक सकारात्मक वार्ता होती.

डॉ. वसंत पटवर्धन