Fri, Jun 05, 2020 02:15होमपेज › Arthabhan › सध्या गुंतवणूकदार उदासीन

सध्या गुंतवणूकदार उदासीन

Published On: May 13 2019 2:07AM | Last Updated: May 13 2019 2:07AM
डॉ. वसंत पटवर्धन

सध्या  सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण तापत असल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना फारसा रस नाही, ते उदासीन आहेत. गेले 19 दिवस विविध कंपन्यांचे मार्च 2019 तिमाहीचे व वर्षाचे आकडे प्रसिद्ध होत आहेत. त्याकडेही बहुतेकांचा कानाडोळाच आहे. 

शुक्रवारी सकाळी निर्देशांक 37542 वर उघडला होता, तर निफ्टी 11291 वर उघडला. पूर्वी विस्तृत परामर्श घेतलेला येस बँक 171 वर उघडला. मुथुट फिनान्स 566 रुपयाला सध्या मिळत आहे. इंडिया बुल्स हाऊसिंग फिनान्स 681 रुपयाला आहे. बजाज फिनान्स 3000 रुपयांच्या मागे पुढे आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजीज 185 रुपयाला आहे आणि हे सर्व शेअर्स सध्याच्या भावाला घेण्यासारखे आहेत. पिरामल एन्टरप्रायझेसने कॅनडातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पेन्शन  फंडात 60 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करायचे ठरवले आहे. ब्रिगेड एन्टरप्रायझेसचा भाव वर्षभरात तो 290 रुपयांपर्यंत जाऊ शकेल, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे मत आहे. मार्च 2021 पर्यंत कंपनी आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

फिलीप कॅपिटल या संस्थेने एलआयसी हाऊसिंग फायनान्स विकत घेण्याची शिफारस केली आहे. सध्या या शेअरचा भाव 476 रु. आहे. वर्षभरात तो 680 रुपयांपर्यंत जावा. गेल्या बारा महिन्यांतील कमाल भाव 583 रुपये होता. तर किमान भाव 388 रुपये होता. रोज सुमारे 14 ते 15 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 9.9 पट दिसते. मार्च 2019 ला संपलेल्या तिमाहीसाठी एलआयसी हाऊसिंगचा नक्‍त नफा 694 कोटी रुपये होता. गृहवित्त क्षेत्रातली ही एक नामांकित कंपनी आहे. मार्च 2018 तिमाहीसाठी कंपनीचा नक्‍त नफा 594 कोटी रुपये होता म्हणजे वर्षभरात त्यात 100 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एलआयसी हाऊसिंगनंतर रेप्को होम्स घेण्यासारखा आहे. सध्या हा शेअर 400 रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात त्यात 20 ते 25 टक्के वाढ दिसावी. रेप्को होम्सचे सध्याचे किं/उ. गुणोत्तर 11.80 पट आहे. हाऊसिंग फायनान्समध्ये तिसरा शेअर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स सध्या 700 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा कमाल भाव 1397 रुपये होता, तर किमान भाव 575 रुपये होता. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचा रोज 7 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. त्याचे किं./उ. गुणोत्तर 7.30 पट आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजीजमध्ये प्रवर्तकांनी बँकांबरोबर शेअर्स न विकण्याचा समझोता केला आहे. 23 मे नंतर भाजपला जर मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या तर 1, 2 महिन्यात शेअरबाजार सुधारू शकेल. 

महिंद्र अँड महिंद्र फिनान्शिअल सर्व्हिसेस सध्या 381 रुपयाला उपलब्ध आहे. बजाज फायनान्सनंतर नॉनबँकिंग फायनान्स कंपन्यातील ही एक चांगली कंपनी आहे. हिच्यातही काही प्रमाणात गुुंतवणूक करायला हरकत नाही. जुलै 2018 मध्ये 1500 रुपयांच्या आसपास रखडलेला लार्सेन अँड टूब्रो इन्फोटेक आता 1680 ते 1700 च्या आसपास स्थिरावला आहे. या शेअरचा गेल्या वर्षभरातील किमान भाव 1437 रुपये होता तर कमाल भाव 1987 रुपये होता. 

आय. जी. पेट्रोकेमिकल्सचा सध्या भाव 

240 रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरातील त्याचा कमाल भाव 670 रुपये होता. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 5.1 पट इतके आकर्षक आहे. इथे काही प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही. 
सन रिअ‍ॅल्टी सध्या 440 रुपयाला उपलब्ध आहे. कंपनी कर्जरोखे किंवा अन्य खासगी प्लेसमेंटमधून 500 कोटी रुपयांच्या टप्प्याटप्प्याने 2000 कोटी रुपये उभे करणार आहे. मार्च 2019 ला संपलेल्या तिमाहीसाठी तिची विक्री 270 कोटी रुपये होती. नफा 63.4 कोटी रुपये होता. मार्च 2018 च्या तिमाहीसाठीचा नफा 61.6 कोटी रुपये होता. 1 रुपयाच्या दर्शनी किंमतीच्या शेअरवर कंपनीने 1॥ रुपयाचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

आय. जी. पेट्रोकेमिकल्सप्रमाणेच 24 रुपयांच्या किमान भावात मिळणारा एक शेअर म्हणून मनाली पेट्रोकेमिकल्स आकर्षक वाटतो. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव 56 रुपये होता. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शेअर्सना सध्या बर्‍यापैकी मागणी आहे. पंजाब नॅशनल बँकेचा शेअर सध्या 85 रुपयाला उपलब्ध आहे. रोज 1॥ लक्ष शेअर्सच्यावर व्यवहार होतो. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 300 रुपयांच्या आसपास आहे.

वर्षभरात तो 15 टक्के तरी वाढू शकेल. रोज 30 लक्षापेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होतो. बँक ऑफ महाराष्ट्र या तिमाहीत नफ्यात आलेली आहे. सध्या या बँकेचा शेअर 16 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यांतील किमान 10.70 रुपये भावापासून तो 50 टक्के वाढला आहे. या तिमाहीत बँकेला 72 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मार्च 2018 च्या तिमाहीत तिचा तोटा 113 कोटी रुपये होता. पुढील वर्ष सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना चांगले जावे.