होमपेज › Arthabhan › गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी

गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी

Published On: Nov 13 2017 2:01AM | Last Updated: Nov 12 2017 10:43PM

बुकमार्क करा

योगेश लाटणेकर

गुंतवणूकदाराचे वय, मासिक उत्पन्‍न, आर्थिकद‍ृष्ट्या अवलंबून असणार्‍या व्यक्‍ती, आर्थिक जबाबदारी, जोखीम घ्यायची क्षमता इ. बाबींचा विचार करून गुंतवणूक सल्‍लागारांच्या मदतीने किंवा योग्य अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा.

अल्पकालीन गुंतवणुकीचे पर्याय :

1) बँक मुदत ठेवी - बँक मुदत ठेवीमध्ये आता 6 ते 7% एवढेच व्याज मिळते. ते सध्याच्या महागाई दराएवढेच आहे. पण आपल्या गरजेसाठी हवे तेव्हा पैसे मिळू शकतात. 2) लिक्‍वीड म्युच्युअल फंड - अल्पकालावधीसाठी म्युच्युअल फंडाच्या लिक्‍वीड फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. परतावा शेअरमार्केटवर अवलंबून असतो. 3) शेअर मार्केटमध्ये योग्य अभ्यास किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेअर्समध्ये इंट्राडे किंवा शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करून किंवा फ्युचर्स ऑप्शन्समध्ये सविस्तर ज्ञान घेऊन अल्पकाळातही चांगली कमाई होऊ शकते. थोडीशी नुकसानीची तयारी ठेवायलाच हवी.

मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय बँक मुदत ठेवी, म्युच्युअल फंडाच्या फिक्स मॅच्युरिटी पर्यायांचा विचार करावा. करबचतीसाठी म्युच्युअल फंडांचे फिक्स मॅच्युरिटी प्लान चांगले. पण या सगळ्यांपेक्षा  मध्यम ते दीर्घ कालावधीत शेअरमार्केटमध्ये शेअर्सवर निश्‍चितच चांगला परतावा मिळत असतो. स्टॉपलॉसचा वापर खुबीने करून मर्यादित नुकसानीच्या शक्यतेवर मोठा फायदा मिळू शकतो. निफ्टीच्या फ्युचर्समध्ये पोझीशनल ट्रेडिंगमध्ये खूपच चांगला उत्पन्‍नाची शक्यता असते.

करबचत :

करबचतीसाठी वर्ष मुदतीच्या बँक मुदत ठेवी, इक्‍विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स, न्यू पेंशन स्किम्स, आयुर्विमा पॉलिशींचा विचार करावा. आयुर्विम्यातून जोखीम संरक्षण मिळते. राजीव गांधी इक्‍विटी योजनेत 50,000 रु. पर्यंतची रक्‍कम पाच वर्षांसाठी ‘लॉक इन’ पद्धतीने गुंतवल्यास करबचत होते. त्यातून दीर्घकालावधीत परतावा खूपच चांगला मिळतो.

रिटायर्ड लोकांसाठी गुंतवणूक :

रिटायर्ड लोकांनी पोस्टाच्या मासिक उत्पन्‍न योजना व म्युच्युअल फंडाच्या मासिक उत्पन्‍न योजनांचा विचार करावा. एकूण गुंतवणुकीच्या 20 ते 40 टक्के रक्‍कम शेअरमार्केटमध्ये गुंतवायला हरकत नाही.

कमाई चांगली होत असल्यावर करबचतीऐवजी चांगला कर भरून विकासकामात हातभार लावण्याचे समाधान मोठे असते. आपला विकास होताना आपल्या देशाचाही विकास झाला पाहिजे. देश समृद्ध झाला पहिजे असा विचार व्हावा.

(तांत्रिक विश्‍लेषक व वायदा बाजाराचे प्रशिक्षक निफ्टी पोझीशन,  पुणे)