Wed, Feb 20, 2019 15:18होमपेज › Arthabhan › अल्गो ट्रेडिंग- शेअर बाजारातील बुलेट ट्रेन!

अल्गो ट्रेडिंग- शेअर बाजारातील बुलेट ट्रेन!

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 08 2018 7:34PMशेअर बाजारातील व्यवहारांचे स्वरूप तंत्रबदलाशी निगडित असून भारतीय शेअरबाजारात आता ‘अल्गो ट्रेड’ची बुलेट ट्रेन सुरू झाली आहे. अत्यंत वेगवान, बिनचूक व्यवहार करणारी ही शेअर व्यापार पद्धती मोठ्या प्रमाणात व्यवहार करणार्‍यांनी यापूर्वी स्वीकारली असून ‘सेबी’ (भारतीय प्रतियुती नियामक मंडळे) या सर्वोच्च संस्थेने या पद्धतीस मान्यता दिल्याने आता लहान प्रमाणात व्यवहार करणार्‍यांनाही ‘अल्गो ट्रेड’ वापरता येणार आहे. ही नवी पद्धती भारतीय शेअर बाजारात गतिमान व्यवहाराचे नवे पर्व सुरू करणारी ठरेल यात शंका नाही. 

‘अल्गो ट्रेड’ पद्धती ही संगणकीय आज्ञावलीवर आधारित असून याला ‘ब्लॅक ब्लॉक्स’ पद्धत असेही म्हणतात. शेअर बाजारात वेळ आणि अचूकता हे फायदा किंवा तोटा ठरवत असतात. नेमके हेच  अत्यंत कार्यक्षमपणे मानवी चुका टाळून करण्याचे काम अल्गो ट्रेड करते. यासाठी जी आज्ञावली असते त्याचे स्वरूप एका सोप्या उदाहरणाने स्पष्ट करता येईल. समजा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजार कलानुसार खरेदी किंवा विक्रीकरायचा असेल तर सध्याच्या चालू बाजार दर कलप्रवाहाने व्यवहार करता येईल. पण यात मानवी चूक तसेच व्यवहार वेळेत न होणे, अपेक्षित उत्तम किंमतीस न मिळणे, असे होऊ शकते. आता तेच अल्गो ट्रेडमध्ये आपण असे करू शकतो. जर रिलायन्स  शेअरची किंमत ही 200 दिवसांच्या चलित सरासरीपेक्षा 20 दिवसांची चलित सरासरी अधिक असेल तर खरेदी करणे व जर 200 दिवसाच्या चलित सरासरीपेक्षा 20 दिवसाची चलित सरासरी कमी असेल तर शेअर विक्री करणे अशी आज्ञावली दिली तर आता संगणकीय पद्धतीने तो निर्णय घेतला जाईल. आता आपण फक्‍त एकच अट घातली अशा अनेक अटी आणि अनेक शेअर्सकरिता व अनेक बाजारात एकचवेळी, अचूकपणे, तत्काळ करणारी व्यवहार पद्धती म्हणजे ‘अल्गो ट्रेड’ होय. हायपरलूप किंवा बुलेट ट्रेन अद्यापी दूर असले तरी अल्गो ट्रेड मात्र तुमच्या स्मार्ट फोनवर घेता येतो!

अल्गो ट्रेडचे असंख्य फायदे असून तुम्ही सर्वोत्तम किंमतीस मोठ्या प्रमाणात व्यवहार करू शकता. तत्काळ व्यवहार होत असल्याने कालाव्यपव्यय झाल्याने पूर्वी नुकसान होई ते या पद्धतीत टाळले जाते. किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल होण्यापूर्वी व्यवहार होत असलेने त्याचा फायदा होतो. विशेषतः मोठे व्यवहार सहजपणे होतात. विविध बाजारात एकाचवेळी व्यवहार करणे शक्य असलेने ज्या बाजारात किंमत कमी आहे तेथून खरेदी व अधिक किंमत असलेल्या बाजारात विक्री असा व्यवहार करून नफा मिळवता येतो.  या पद्धतीत मानवी चूक, भावनिक निर्णय होत नाहीत हा महत्त्वाचा फायदा आहे. पूर्वीची आकडेवारी वापरून (भावकॉपी घेऊन) आपण आपली प्रणाली तपासून घेऊ शकतो, अशी पूर्व तपासणी (Back Testing) केल्याने चूक होत नाही. उच्च वारंवारिता व्यापार (HFT-High Frequency Trade)  करणार्‍यांना अल्गो ट्रेड महत्त्वाचे साधन आहे. 

अल्गो ट्रेड व्यवस्था ही म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, विमा कंपन्या अशा मोठ्या गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीस उपयुक्‍त आहे. जेव्हा अशा संस्थांकडून मोठी खरेदी होते तेव्हा त्या शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता असते. अशी किंमत वाढ होऊ नये यासाठी सातत्याने थोडी थोडी खरेदीचे तंत्र अल्गो देते. तसेच अल्पकालीन (दिनमाती Day Trader )व्यवहार करणारे ब्रोकर यांना याचा उपयोग होतो. ज्यांना एकाचवेळी  त्याच शेअरची खरेदी व विक्री असा जोडव्यापार (Pairs traders) करणारे त्यांनाही हे साधन उपयोगी आहे.  अल्गो ट्रेड विविध पद्धती  (Strategy) शक्य आहे. यातील प्रमुख पद्धती म्हणजे कलानुसार व्यवहार  (Trend following) पद्धती आहे.  चलित सरासरी, किंमत पातळीवरून यावर आधारित व्यवहार केले जातात. दुसरी पद्धती ही व्याप्ती किंवा रेंज आधारित आहे. प्रत्येक शेअरची किंमत त्याच्या सरासरी किंमतीकडे येण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते या सिद्धांतावर ही पद्धत आधारित आहे. त्यामुळे जर बाजार किंमत सरासरीच्या वर असेल तर विक्री करणे व सरासरी किंमतीच्या खाली असेल तर खरेदी करणे असे यात धोरण असते. या प्रमुख  पद्धती व्यतिरिक्‍त इतर अनेक पद्धती आहेतच! 

‘अल्गो ट्रेड’ करण्यासाठी ज्या आवश्यक अटी असतात त्या काळजीपूर्वक पूर्ण केल्यानंतर याचा वापर करावा. ही पद्धत हाताळण्यासाठी आवश्यक आज्ञावली हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी काही तयार आज्ञावली (रेडीमेड सॉफ्टवेअर) उपलब्ध आहेत. वेगवान संगणक, हायस्पीड नेट उपलब्धता या मूलभूत अटीसोबत जी स्ट्रॅटेजी किंवा निर्णय पद्धती वापरणार तिचे पूर्वतपासणी होणे आवश्यक आहे. एक अतिशय वेगवान कार हायवेवर चालवण्याचा आनंद घेणे यासाठी गाडी, रस्ता जेवढा महत्त्वाचा तेवढाच ड्रायव्हर महत्त्वाचा! जर डे ट्रेडिंगमध्ये सातत्याने कुशलता प्राप्त केली असेल तरच याचा विचार करावा। तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळाचे काम नोहे॥ ही तुकोबांची आज्ञावली पाळणे उत्तम! 

डॉ. विजय ककडे