होमपेज › Arthabhan › अर्थभान : डेट म्युच्युअल फंडचे फायदे

अर्थभान : डेट म्युच्युअल फंडचे फायदे

Published On: Jun 11 2018 1:10AM | Last Updated: Jun 11 2018 1:10AMनवीन आर्थिक वर्षात गुंतवणूक करू इच्छित असाल तर मुदत ठेवी किंवा पोस्ट ऑफिसबरोबरच डेट म्युच्युअल फंडचा देखील विचार करायला हरकत नाही. डेट म्युच्युअल फंडच्या टॉप स्किमचा परतावा हा पोस्ट ऑफिस आणि बँकेपेक्षा अधिक राहिलेला आहे. सर्वात चांगल्या डेट म्युच्युअल फंडचा परतावा हा 15 टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेला असून तो बँक आणि पोस्टापेक्षा अधिक आहे. म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत. बाजारात कितीही चढउतार झाला तरी या फंडमधील गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही. इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक थेट बाजाराशी लिंक असल्याने जोखीम अधिक असते. तुलनेने डेट फंडमधील गुंतवणूक कमी जोखमीची असते.

डेट म्युच्युअल फंड कशासाठी?

गुंतवणुकीसाठी डेट म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. देशात म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता ही 22 लाख कोटी रुपये इतकी आहे. यातील सुमारे 14 लाख कोटी रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये आहेत. डेट म्युच्युअल फंडमध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही व्यक्‍तीपेक्षा कंपन्या अधिक करतात. याठिकाणी थोड्या कालावधीसाठी चांगला परतावा पदरात पाडून घेऊ शकतो. म्हणूनच कॉर्पोरेट कंपन्या कमी कालावधीसाठी बँकेपेक्षा डेट फंडवर अधिक विश्‍वास ठेवतात. सामान्य नागरिकांनी देखील या ठिकाणी गुंतवणूक करून लाभ मिळवायला हरकत नाही. 

टॉट डेट म्युच्युअल फंड

सर्वच डेट फंड चांगला परतावा देत आहेत, असे नाही. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. चांगली योजना निवडून जर गुंतवणूक केली तर आपल्यालाही चांगला परतावा मिळू शकतो. त्यात इंडियाबुल्स सेव्हिंग इन्कम फंड-डीपी (ग्रोथ), टोरस अल्ट्रा एसटीबीएफ-डायरेक्ट (ग्रोथ), टौरस डायनॅमिक इन्कम फंड-डायरेक्ट (ग्रोथ), बँक ऑफ इंडिया एक्सए, रेग्यूलर रिटर्न-डायरेक्ट (ग्रोथ) आणि यूटीआय एमआयएस-अ‍ॅडव्हान्टेज प्लॅन-डायरेक्ट (ग्रोथ) या निवडक चांगल्या फंडचा समावेश आहे. इंडियाबुल्सने एका वर्षात 15 टक्के परतावा दिला आहे. 

व्याजदरात चढउतार 

सुरक्षेबरोबरच बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षा चांगला परतावा हवा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी डेट फंड उपयुक्‍तआहेत. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या व्याजदरात सातत्याने चढउतार होत आहेत. अशा स्थितीत डेट फंड हा चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. याठिकाणी चांगला परतावा ग्राहकांना मिळत आहे. म्हणूनच डेट फंडमध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे. 

गुंतवणूक आणि पैसे काढणे सोपे

बँक आणि पोस्ट ऑफिसच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधून पैसा काढणे खूपच सोपे आहे. आपण ऑनलाइन गुंतवणूक करू इच्छित असाल तर कोणत्याही दिवशी गुंतवणूक करू शकता. आपण एसआयपीची निवड केली असेल तर दरमहा निश्‍चित रक्‍कम या फंडमध्ये जमा होत राहील. ही गुंतवणूक कधीही थांबवता येते. तसेच पैसे काढण्याची प्रक्रिया देखील सुटसुटीत आहे. आपण एकाच वेळी सर्व पैसे काढू शकतो किंवा गरजेनुसार टप्प्याटप्प्याने पैसे काढू शकतो. किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान किती पैसे ठेवावेत, यावरही बंधन नाही. जर या योजनेत थोडाफार पैसा राहिला असेल तर त्यावरही परतावा मिळतो.  

सुभाष वैद्य