होमपेज › Ankur › खरा माणूस!

खरा माणूस!

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 06 2018 6:55PMआसिफ अतिशय उद्धट माणूस होता. तो गावात लोकांची टर उडवत उंडरायचा. एकदा तो गावच्या इमामाकडे गेला व त्याला विचारले “तुमचं नाव बकरा आहे असं मला कोणी तरी सांगितलं!” इमामाने शांतपणे उत्तर दिले, “माझं नाव बकरा नाही, बाकिर आहे.” इमाम चिडावा या उद्देशाने आसिफ म्हणाला, “असो, तुमचं नाव काहीही असो पण तुमची आई एक स्वयंपाकीण होती असं लोक बोलतात.”“पोटभरण्यासाठी तिला लोकांकडे स्वयंपाक करावा लागायचा पण त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही,” 

इमाम बर्फासारखा थंड होता. त्याच्या शांतपणामुळे अस्वस्थ झालेला आसिफ इरेला पेटला व म्हणाला,“तुमची आई कजाग व भांडखोर होती असंही लोक बोलतात.” “जर तू बोलतोस ते खरं असेल तर खुदा माझ्या आईला माफ करो आणि जर खोटं असेल तर खुदा तुला माफ करो.” इमाम पूर्वीएवढाच शांत होता.त्याच्या या शांत स्वभावामुळे चकीत झालेला आसिफ त्याला म्हणाला.“तुम्ही मला खरोखर लाजवलंत. तुमच्याबद्दल आणि तुमच्या आईबद्दल जे मी बोललो त्यासाठी मला क्षमा करा व तुमचा शागीर्द बनवा.” इमामाने त्याची विनंती स्वीकारली. पुढे आसिफने एक चांगला माणूस म्हणून लौकिक 
मिळवला.