Tue, Jul 23, 2019 18:41होमपेज › Ankur › अजब-गजब : संत्री युद्ध

अजब-गजब : संत्री युद्ध

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 11 2019 2:03AM
स्पेनमध्ये एकमेकांना टोमॅटो फेकून मारण्याचा जसा विचित्र सण आहे तसाच एक विचित्र सण इटलीतही साजरा केला जातो. मात्र टोमॅटोऐवजी संत्र्यांचा वापर या सणात केला जातो. 

12 व्या शतकापासून उत्तर इटलीतील इव्हरिया शहरात दरवर्षी 2 ते 5 मार्च या काळात हा सण साजरा होतो. मध्ययुगातील एका जुलमी सरदाराविरुद्ध जनतेने केलेल्या बंडाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो. 

या सणात काही लोक सरदाराचे सैनिक होतात व घोडागाडीतून येतात व त्यांच्याविरुद्ध काही लोक बंडखोरांच्या वेशात असतात. मध्ययुगीन पोशाख करून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर संत्र्यांचा प्रचंड मारा करतात.

यावेळी हजारो टन संत्र्यांचा वापर होतो. रस्त्यावर नारंगी रंगाचा चिखल निर्माण होतो. हा सण पाहणारे दर्शक लाल रंगांची टोपी घालतात. या दर्शकांवर संत्री फेकण्यास मनाई असली तरी त्यांच्यावरही एखाददुसरे संत्रे पडतेच. सण संपल्यानंतर उत्कृष्ट स्पर्धकांना व उत्तम सजावट केलेल्या घोडागाड्यांना बक्षिसे दिली जातात. 

एका अंदाजानुसार सुमारे 3 हजार टन संत्री या संत्रीयुद्धात वापरली जातात.  ही संत्री कमी प्रतीची व मानवाला खाण्यायोग्य नसतात.