Sat, Aug 24, 2019 10:03होमपेज › Ankur › किरणोत्सर्गबाधित गावात एकटा राहणारा अवलिया

किरणोत्सर्गबाधित गावात एकटा राहणारा अवलिया

Published On: May 18 2019 1:45AM | Last Updated: May 18 2019 1:45AM
‘तुम्हाला दीर्घकाळ जगायचं असेल तर जेथे तुम्ही जन्मलात तेथेच आयुष्यभर राहा,’ असे म्हणणे आहे 90 वर्षीय इव्हान शाम्यानुक या बेलारूसच्या नागरिकाचे! आपल्या या मतावर हा पठ्ठ्या एवढा ठाम आहे की त्याचे गाव चेर्नाबिल आण्विक दुर्घटनेनंतर मानवाला राहण्यास अयोग्य बनले तरी इव्हानने गाव सोडले नाही. 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीत भयंकर विस्फोट झाला. किरणोत्सर्गी धुळीचे ढग युक्रेन बेलारूस सीमेवरील इव्हानच्या टुलगोविच गावापर्यंत पोहोचले. त्यामुळे या परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांनी स्थलांतर केले पण इव्हान व त्याच्या पत्नीने त्यांचे गाव सोडायला नकार दिला.

पत्नीच्या निधनानंतर आता इव्हान एकटाच या गावात राहतो.इव्हानने काही डुकरे पाळली असून त्याला लागणार्‍या वस्तू घेऊन एक मोटार दर आठवड्याला गावात येते. दर आठवड्याला डॉक्टर येऊन इव्हानची तपासणी करतो. किरणोत्सर्गाचा फारसा परिणाम इव्हानवर झालेला नाही. दुर्घटनेला 32 वर्षे उलटलेली असल्याने किरणोत्सर्गाचा धोका कमी झाला आहे. इव्हानच्या गावातील सुमारे 31 लोक कर्करोगाने मरण पावले तरीही किरणोत्सर्गी धुळीत 32 वर्षे काढून इव्हान शंभरीच्या दिशेने कूच करतो आहे हे विशेष!