होमपेज › Ankur › कथा : धर्मशाळा

कथा : धर्मशाळा

Published On: Jun 09 2018 1:39AM | Last Updated: Jun 08 2018 8:13PMएकदा एक प्रसिद्ध झेन गुरू चीनचा महान सम्राट एडोच्या महालाजवळून जात होता. सूर्य अस्त होत होता. दिवसभर प्रवचने दिल्याने झेन गुरू अतिशय थकलेले होते. रात्री निवास करता येईल अशा जागेच्या शोधात ते होते. त्यांनी एडोच्या किल्ल्यात जायचे ठरविले. किल्ल्याच्या पहारेकर्‍यांनी झेन गुरूला ओळखले व सम्राटाच्या दरबारात पोहोचवले. सिंहासनावर बसलेल्या सम्राटाने झेन गुरूचे आसनावरून उठून आदरपूर्वक स्वागत केले. तो म्हणाला.

“या गुरुवर्य, आपले स्वागत आहे. बोला मी तुमची काय सेवा करू?”
झेन गुरू उत्तरले, “या धर्मशाळेत एका रात्रीपुरती राहण्याची माझी सोय कर.”
“आपण हवा तेवढा काळ येथे राहू शकता, पण गुरुवर्य आपला काही तरी गैरसमज होत आहे. ही धर्मशाळा नाही माझा महाल आहे.” सम्राट एडो म्हणाला.
“तुझ्या अगोदर येथे कोण राहत होते?” झेन गुरूने विचारले.
“अर्थात माझे वडील.” सम्राटाने उत्तर दिले.
“ते आताही येथे राहतात का?” झेन गुरू.
“नाही. दुर्दैवाने गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले.” सम्राट एडो.
“तुझ्या वडिलांच्या पूर्वी येथे कोण रहायचे?” “माझे आजोबा. ते तर अनेक वर्षापूर्वी निधन पावले.”
झेन गुरू म्हणाले, “हे महान सम्राट एडो, जेथे लोक अगदी अल्प कालावधीसाठी राहतात व पुढच्या प्रवासाला निघतात ती जागा धर्मशाळाच नव्हे काय?”झेन गुरूंच्या या प्रश्‍नामागील मर्म सम्राट एडोने ओळखले. तो त्यांच्यापुढे नतमस्तक झाला.
(झेन कथा)