Sun, Feb 24, 2019 02:36होमपेज › Ankur › रात्री उडणारी वटवाघळे

रात्री उडणारी वटवाघळे

Published On: Feb 10 2018 1:26AM | Last Updated: Feb 09 2018 9:14PMकोणे एकेकाळी प्राणी व पक्षी एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात वारंवार लढाया होत असत. गंमत म्हणजे आपण का लढतोय ते त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. या सर्व लढाया पाहणार्‍या वटवाघळाने पक्ष्यांच्या गटात सामील व्हायचे ठरविले. याचे कारण पक्ष्यांचे पारडे जड आहे, असे त्याला वाटले. मात्र पक्ष्यांनी त्याला सुरुवातीला नाकारलेे.

“तू काही पक्षी नाहीस. आम्ही तुला आमच्या गटात घेऊ शकत नाही!” सर्व पक्षी एका सुरात म्हणाले.“असं काय करता? पहा माझ्याकडे! मलाही तुमच्यासारखे पंख आहेत.” वटवाघूळ म्हणाले. “ठीक आहे,” कावळा म्हणाला, “याला आपल्यामध्ये सामील होऊ द्या. याची आपल्याला मदतच होईल.”वटवाघूळ पक्ष्यांच्या गटात सामील झाले. युद्ध सुरूच राहिले. कालांतराने प्राण्यांची सरशी होऊ लागली. वटवाघळाला पराजितांच्या गटात राहायचे नव्हते. ते लगेच प्राण्यांकडे गेले.“मी तुमच्या गटात येऊ शकतो का?” त्याने हत्तीला विचारले.“आम्ही प्राणी आहोत, पक्षी नाही.” हत्ती जोरात हसत म्हणाला. “आम्ही पक्ष्यांना आमच्या गटात घेत नाही.” चित्ता हत्तीची री ओढत म्हणाला.“पण मी एक प्राणी आहे. पहा, मला तुमच्यासारखे दात आहेत.” असे म्हणून वटवाघळाने त्याचे दात दाखविले. मात्र प्राण्यांना त्याचा युक्‍तिवाद पटला नाही. त्यांनी वटवाघळाला हाकलून लावले. “कदाचित मला पक्ष्यांकडे पुन्हा जायला हवे, ते मला पुन्हा त्यांच्या गटात घेतील.” वटवाघूळ स्वत:शीच म्हणाले. मात्र आता पक्षीही त्याला त्यांच्या गटात घेऊ इच्छित नव्हते. “आम्ही तुला प्राण्यांकडे त्यांच्या गटात सामील करण्याची याचना करताना पाहिले आहे.” गरुड म्हणाले. “आम्ही पराभूत होत असताना तू आम्हाला सोडून पळून गेलास. येथून निघून जा व परत येऊ नकोस,” म्हातारा कावळा रागावून म्हणाला. तेव्हापासून स्वत:ची लाज वाटू लागल्यानेच वटवाघूळ नेहमी दिवसा दिवाभीतासारखे लपून राहते व रात्रीच उडते, जेव्हा त्याला कोणी पाहत नाही.
(आफ्रिकन कथा)