Thu, Nov 14, 2019 06:19होमपेज › Ankur › अजब-गजब : प्लास्टिकच्या बाटल्यांचे घर

अजब-गजब : प्लास्टिकच्या बाटल्यांचे घर

Published On: Jul 06 2019 1:29AM | Last Updated: Jul 05 2019 8:18PM
हजारो रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांवर पुनर्प्रक्रिया करणे तसे खर्चिकच असते. नायजेरियातील लोकांनी या रिकाम्या बाटल्यांचा उपयोग चक्‍क घराच्या निर्मितीसाठी करून घराचा खर्च तर वाचवला आहेच शिवाय पर्यावरण समस्या सोडविण्याचाही प्रयत्न केला आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर बनवण्यासाठी प्रथम रिकाम्या बाटल्या जमवल्या जातात व त्यात कोरडी माती भरली जाते. या बाटल्या मग विटांप्रमाणे एकावर एक रचून भिंती उभारल्या जातात. बाटल्या स्थिर रहाव्या म्हणून लाकडी काठ्यांचा आधार दिला जातो. कधी कधी मातीऐवजी वाळूही बाटल्यांत भरली जाते. आश्‍चर्य म्हणजे प्लास्टिक बाटल्यांपासून बनलेली ही घरे उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात उबदार राहतात. बाटल्यांतील माती व वाळू घरातील तापमान ठराविक मर्यादेबाहेर जाऊ देत नाही. प्लास्टिक बाटल्यांची ही घरे एक स्वस्त पर्याय तर आहेच शिवाय प्लास्टिक बाटल्यांच्या समस्येवर एक उपाय आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक बाटल्यांपासून घर बनवण्यास प्रथम भारत, मध्य व दक्षिण अमेरिका येथे सुरुवात झाली व त्यापासून आफ्रिकन लोकांनी प्रेरणा घेतली आहे.