Thu, Nov 14, 2019 06:38होमपेज › Ankur › कथा : चित्त्याचे अश्रू

कथा : चित्त्याचे अश्रू

Published On: Jul 06 2019 1:29AM | Last Updated: Jul 05 2019 8:22PM
झुलू जमातीच्या एका टोळीतील एक योद्धा अतिशय आळशी होता. शिकार करणे त्याच्या अगदी जिवावर यायचे. एकदा त्याने एका मादी चित्त्याला शिकार करताना पाहिले. हरणांच्या कळपातून दुबळे हरिण हेरून त्याची शिकार करण्याचे तिचे कसब पाहून तो झुलू योद्धा चकित झाला. जर चित्त्यांनी त्याच्यासाठी शिकार केली तर किती आराम करायला मिळेल, असा विचार त्याच्या मनात आला. 

मादी चित्त्याला तो घरी नेऊ शकत नव्हता म्हणून त्याने त्या मादी चित्त्याची तीन पिल्‍ले पळवली. मादी चित्त्याला जेव्हा तिची पिल्‍ले आढळली नाहीत तेव्ही ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचा आवाज झुलू लोकांच्या गावापर्यंत पोहोचला.

काय भानगड आहे हे पाहण्यासाठी झुलू टोळीचा प्रमुख जंगलात गेला. त्याला तेथे मोठमोठ्याने रडणारी मादी चित्ता व तिच्या जवळ पडलेला एक भाला दिसला. तो भाला त्या आळशी योद्ध्याचा होता. घाईघाईत तो तेथे भाला विसरला होता. 

टोळी प्रमुखाने गावात जाऊन आळशी योद्ध्याला चांगलेच खडसावले व मादी चित्त्याची तीन पिल्‍ले तिला परत केली. मादी चित्त्याला पिल्‍लांना पाहून अतिशय आनंद झाला. पण बराच वेळ रडल्याने तिच्या गालावर अश्रूच्या खुणा निर्माण झाल्या, ज्या तुम्ही आजही प्रत्येक चित्त्याच्या गालावर पाहू शकता.